प्रत्येक घरात रोज पुस्तक वाचले जावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे
अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप व वाचन प्रेरणा दिन संपन्न

कोल्हापूर, दि. 14 (.) : वाचन हे मन आणि बुद्धी समृद्ध करण्याचे खरे साधन आहे. मोबाईलच्या आहारी जाऊन वाचनसंस्कृती हरवू नये म्हणून प्रत्येक घरात रोज पुस्तक उघडले गेले पाहिजे. तोच खरा वाचन प्रेरणा दिनाचा संकल्प असावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. मराठी भाषा समिती कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महावीर महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताह समारोप समारंभ व वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार प्रवीण बांदेकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे आत्मचरित्र वाचावे आणि दरमहा किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. या प्रसंगी सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांनी मराठी भाषेच्या सर्जनशील परंपरेवर आणि विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती क्षमतेच्या विकासावर भाष्य केले.
प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील लिखित खंडांचा उल्लेखही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात केला. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना पुस्तके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी महाविद्यालयात लावलेल्या भित्तीपत्रके प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री.अमोल येडगे यांनी केले.
मराठी भाषेच्या प्रचारप्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी महावीर महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले. अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्सव समितीचे प्रमुख डॉ. गुंडोपंत पाटील यांनी जिल्हाभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा सादर केला.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य श्वेता परुळेकर यांनी केला. आभार प्रदर्शन जयवंत दळवी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सायली चौधरी यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव मोहन गरगटे, प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, प्रा.(डॉ. अरुण पाटील, प्रा. डॉ. एकनाथ पाटील तसेच विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक विद्यार्थी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000