व्यापक दृष्टिकोनासाठी वाचन प्रेरणा अंगी बाणवावी लागेल…. प्रसाद कुलकर्णी
नाईट कॉलेज मध्ये वाचनप्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
इचलकरंजी ता.१५ सकस पुस्तकांच्या वाचनातूनच माणसे आणि त्यांचे मानस कळत असते. व्यक्तिमत्व विकसित करायचे असेल तर वाचन संस्कृती विकसित करण्याशिवाय पर्याय नाही. ही वाचन संस्कृती स्वतःपासून विकसित करावी लागते. जुन्या पिढीतील वाचलेली, ऐकलेली माणसे आजही नव्या स्वरूपामध्ये समाजाच्या सर्व क्षेत्रात वावरत आहेत.पण आमची सामूहिक दृष्टी कमजोर,क्षीण झाली आहे. आणि आपल्यापैकी अनेकांचा समाजमाध्यमांवर अनाठाई वेळही वाया जात आहे.अशावेळी तीक्ष्ण व व्यापक दृष्टिकोनासाठी वाचन प्रेरणा अंगी बाणवावी लागेल. आणि असलेल्या वेळेचा स्वतःच्या व समाजाच्या विकासासाठी सदुपयोग करावा लागेल. भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा वृद्धिंगत करण्यासाठी आहे. त्यामागील अन्वयार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे,असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) आणि नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (इचलकरंजी) यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ” पुस्तकात वाचलेली माणसे गेली कुठे ! ” या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विरुपाक्ष खानाज होते.यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले वाचन प्रेरणा ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली आहे. वाचन, लेखन आणि श्रवण या कलांमुळे मानवी जीवन समृद्ध झाले आहे. यामधूनच खरी शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगती घडून येते. स्वतःची खरी ओळख ही वाचनातूनच घडते. याकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, वाचन संस्कृती जोपासल्यास महान व्यक्तिमत्त्वे निर्माण होतात. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांसारखी महनीय व्यक्तिमत्वे वाचनातूनच घडली आहेत.साने गुरुजी म्हणायचे भारतीय संस्कृती ही अशांतीकडून शांतीकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, भेदापासून अभेदाकडे, विरोधाकडून विकासाकडे, गोंधळातून व्यवस्थेकडे आणि वाईटाकडून चांगल्याकडे नेणारी संस्कृती आहे. वाचनाच्या माध्यमातूनच आपण सर्वांगीण परिवर्तन करू शकतो.
अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना प्राचार्य डॉ विरुपाक्ष खानाज यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासणे गरजेचे आहे हे अधोरेखित केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा . एफ एन पटेल यांनी केले तसेच पाहुण्यांची ओळख प्रा . सौरभ पाटणकर यांनी केले .कार्यक्रमासाठी ग्रंथपाल डॉ . जी .बी खांडेकर, डॉ . प्रवीण पवार, प्रा . अभिजीत पाटील, डॉ . जीवन पाटील ,प्रा .प्रमोद काळे, प्रा.सौ पूजा खंजिरे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थीच्या मध्ये वाचनाची आवड चिंतनशीलशीलता आणि विचारशक्ती वृद्धिगत करणारा होता. आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले.