वाचनातून विचाराला निर्भीडपणाचे पंख फुटतात …
प्रा.डॉ. एफ. एम. पटेल यांचे प्रतिपादन
इचलकरंजी ता. १५, पुस्तक म्हणजे केवळ शब्दाचे संकलन नव्हे तर मानवाच्या चेतनेचा प्रवास आहे . ते अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारे पवित्र साधन आहे.विचारांना निर्भीडतेचे पंख देणारे आणि आचरणाला सर्वस्व देणारे माध्यम म्हणजे पुस्तक . ज्ञानाचा दीप आत्मजागृती मानवतेचे रक्षण करणारे तत्व – मूल्य – अंधश्रद्धा – अन्याय – अत्याचारावर प्रहार करणारे ठरत असते.वाचन म्हणजे स्वतःला घडवणे. वाचनातील विचार म्हणजे आत्मजागृतीचा किरण असतो. वाचन मनाला संस्कार करणारे असून विवेकाला धार देणारे आणि समाजाला सजग बनवणारे असते . वाचन प्रेरणा ही जीवन समृद्ध करण्याची व्यवस्था असते असे मत प्रा.डॉ.एफ .एन पटेल यांनी व्यक्त केले.
ते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिन समारंभात बोलत होते.यावेळी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला प्रा .रमेश लवटे व पांडुरंग पिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच प्रबोधन वाचनालयाच्या दिवाळी अंक सभासद योजनेचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी अन्वर पटेल, शकील मुल्ला, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, कविता डांगरे, दादासाहेब कांबळे, संदीप डिंगणे, प्रकाश कोंडेकर, सूर्यकांत घोडके, मुरलीधर कांबळे, पवन काटकर,रमेश चचडी ,भीमराव नाईकवडी आदी उपस्थित होते.