अकिवाटच्या तरुणाईचा आदर्श: पाडव्याच्या मुहूर्तावर ‘शोरूम ॲम्बुलन्स’ गावाला समर्पित
अकिवाट (ता. शिरोळ): दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अकिवाट गावातील दोन कर्तव्यनिष्ठ युवकांनी समाजासमोर एक उत्तुंग आदर्श ठेवला आहे. गावातील गरजू रुग्णांना तातडीची आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा वेळेवर मिळावी, या उदात्त हेतूने श्री. सुयोग तवंदकर आणि श्री. इम्रान सनदी या तरुण मित्रांनी एकत्र येत गावासाठी ‘शोरूम ॲम्बुलन्स’ (नवीन रुग्णवाहिका) उपलब्ध केली आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची गरज ओळखून या संवेदनशील युवकांनी स्वखर्चातून आणि महत्त्वपूर्ण आर्थिक योगदानातून ही सुसज्ज आणि अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. या निर्णयामुळे आता तातडीच्या वेळी रुग्णांना वेळेवर मोठ्या रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
आज पाडव्याच्या मंगलमय दिवशी, सामाजिक कार्यकर्ते रमेशकुमार मिठारे, रमेश कांबळे, माणुसकी फौंडेशनचे कार्यकर्ते तसेच गावचे सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकेचे थाटात लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. सुयोग तवंदकर म्हणाले, “दिवाळी हा सण केवळ स्वतःच्या आनंदासाठी नाही, तर इतरांच्या जीवनातील अडचणी दूर करून त्यांना मदत करण्याचा संकल्प करण्याचा आहे. आम्ही या पाडव्याच्या दिवशी ही ॲम्बुलन्स गरजू रुग्णांसाठी वेळेवर मिळणारे जीवनदान म्हणून गावाला समर्पित करत आहोत.”
श्री. इम्रान सनदी यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, “अत्यावस्थ रुग्णांना तातडीच्या वेळी होणारे हाल पाहून मन नेहमीच हेलावून जायचे. सुयोग आणि मी एकत्र आलो आणि ही आरोग्यसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज पाडव्याचा शुभ दिवस साधून ही जीवनरक्षक सेवा गावकऱ्यांच्या चरणी अर्पण करताना मनस्वी आनंद होत आहे.”
सुयोग तवंदकर आणि इम्रान सनदी यांच्या या उदात्त कार्यामुळे संपूर्ण अकिवाट आणि शिरोळ तालुक्यात त्यांचे मोठे कौतुक होत आहे. या दोघांच्या समाजसेवेच्या भावनेला गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी भरभरून दाद दिली आहे. या नवीन ‘शोरूम ॲम्बुलन्स’मुळे अकिवाट आणि आसपासच्या वस्त्यांमधील आरोग्य सेवा आता अधिक जलद आणि प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल, यात शंका नाही.
Posted inकोल्हापूर
अकिवाटच्या तरुणाईचा आदर्श: पाडव्याच्या मुहूर्तावर ‘शोरूम ॲम्बुलन्स’ गावाला समर्पित
