ऐषाराम की साधेपणा? भ्रष्टाचारावर नजर ठेवणाऱ्या ‘लोकपाल’ला ७० लाखांच्या BMW चा मोह; निर्णय टीकेच्या केंद्रस्थानी
नवी दिल्ली: देशात भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी स्थापन झालेल्या ‘लोकपाल’ (Lokpal) संस्थेकडून एक असा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भ्रष्टाचारविरोधी लढ्याची शपथ घेतलेल्या या संस्थेला आता आलिशान कारची (Luxury Cars) भुरळ पडली असून, लोकपालने अध्यक्ष आणि इतर सदस्यांसाठी तब्बल प्रत्येकी ७० लाख रुपये किमतीच्या सात BMW 3 सिरीज Li कार खरेदी करण्याची निविदा (Tender) काढली आहे.
४.९ कोटींचा खर्च: ऐषारामाचे नवे टोक
लोकपालचे अध्यक्ष आणि इतर सहा सदस्य (एकूण ७ जणांसाठी) या कार खरेदी केल्या जाणार आहेत. प्रत्येक कारची किंमत सुमारे ७० लाख रुपये असून, एकूण ७ कारसाठी सुमारे ४.९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. १६ ऑक्टोबर रोजी ही खुली निविदा जारी करण्यात आली असून, यामध्ये ‘भारताच्या लोकपालने प्रतिष्ठित एजन्सींकडून सात BMW 3 सिरीज Li कार पुरवठ्यासाठी’ प्रस्ताव मागवले आहेत.
‘साधेपणा’ची शपथ आणि ‘BMW’चा मोह
लोकपाल संस्थेचे अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर कार्यरत आहेत. देशात जेव्हा साधेपणा आणि सरकारी खर्चात कपात करण्याची चर्चा सुरू आहे, तेव्हा भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी स्थापन झालेल्या संस्थेकडूनच इतका मोठा खर्च होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘भ्रष्टाचार थांबवण्याऐवजी लोकपाल आपल्याच ऐषारामात मग्न आहे,’ अशा शब्दांत हा निर्णय ऑनलाइन आणि राजकीय वर्तुळात तीव्र टीकेचा विषय बनला आहे.
टीकाकारांकडून कठोर शब्दांत टीका
लोकपालच्या या निर्णयावर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे.
- प्रशांत भूषण यांचा थेट आरोप: ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “भ्रष्टाचाराची चिंता नसलेले आणि केवळ आपल्या ऐषारामात आनंदी असलेले चाटूगिरी करणारे सदस्य नेमून सरकारने लोकपाल संस्थेची माती केली आहे. आता हेच लोक स्वतःसाठी ७० लाख रुपये किमतीच्या BMW गाड्या खरेदी करत आहेत!”
- समाज माध्यमांवर उपहासात्मक प्रतिक्रिया: ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्यांनीही या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. एका वापरकर्त्याने उपहासाने लिहिले, “ते (लोकपाल सदस्य) ७० लाख रुपये किमतीची कार खरेदी करत आहेत. ते तर १२ कोटी रुपये किमतीची रोल्स रॉयस (Rolls Royce) देखील खरेदी करू शकले असते… पण त्यांनी तसे केले नाही, कारण ते साधे आणि जमिनीवर पाय असलेले लोक आहेत. म्हणूनच त्यांनी BMW निवडली…”
चालकांसाठी ७ दिवसांचे विशेष प्रशिक्षण
या आलिशान कार पुरवठा करणाऱ्या BMW कंपनीला लोकपालच्या चालकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी सात दिवसांचे विशेष प्रशिक्षण (Training) आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक गाड्यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणि कार्यप्रणाली (Electronic Systems and Operations) बद्दल माहिती दिली जाईल.
उद्देशावर प्रश्नचिन्ह:
भ्रष्टाचार संपवून प्रशासनाला नैतिकता आणि साधेपणाची शिकवण देण्यासाठी स्थापन झालेल्या संस्थेकडूनच अशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च केवळ आलिशान गाड्यांवर होत असल्याने, लोकपाल संस्थेची कार्यशैली आणि प्राधान्यक्रम यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. निविदा सूचनेनुसार, हे प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून ९० दिवसांपर्यंत वैध राहतील, परंतु या वादावर लोकपाल काय स्पष्टीकरण देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
