जयसिंगपूर खून प्रकरणाचा १२ तासांत छडा; मुख्य सूत्रधारासह ४ आरोपी अटकेत, पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक
जयसिंगपूर: जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक १३ येथे झालेल्या निघृण खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात जयसिंगपूर गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाला अवघ्या १२ तासांत मोठे यश मिळाले आहे. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान तपास
या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानुसार, पथकाने तात्काळ सूत्रे हलवत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींच्या शोधाची मोहीम वेगाने राबवली.
अटकेतील आरोपींकडून खुनाची कबुली
पथकाने केलेल्या वेगवान कारवाईत, खुनातील प्रमुख आरोपी शेखर महादेव पाथरवट (वय ३०) आणि सागर परशुराम कलकुटगी (वय ३१) यांना बसवाना खिंड, तमदलगे परिसरातून ताब्यात घेतले. तसेच, इतर दोन आरोपी विजय लक्ष्मण पाथरवट (वय ४३) आणि संजय लक्ष्मण पाथरवट (वय ४७) यांना चौडेश्वरी फाटा परिसरातून शिताफीने अटक करण्यात आली. अटकेतील सर्व आरोपी जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.
आरोपींना जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आणून कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
फरार दोन आरोपींचा शोध सुरू
सध्या या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही यशस्वी आणि जलद कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, शेष मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, महेश खोत, संजय कुंभार, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी, लखन पाटील आणि हंबीरराव माने यांच्या संयुक्त पथकाने केली.
पोलिसांनी दाखवलेल्या या जलद आणि शिताफीने केलेल्या कारवाईबद्दल आणि खुनाचा अवघ्या १२ तासांत छडा लावल्याबद्दल जयसिंगपूर परिसरातील नागरिकांतून त्यांचे विशेष कौतुक व्यक्त होत आहे.
Posted inक्राइम
जयसिंगपूर खून प्रकरणाचा १२ तासांत छडा; मुख्य सूत्रधारासह ४ आरोपी अटकेत, पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक

