मुंबईत ‘संविधान सन्मान महासभा’ २५ नोव्हेंबर रोजी; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन!
वंचित बहुजन आघाडीची मोठी घोषणा; दादरच्या शिवाजी पार्कवर महासभेचे आयोजन
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ, वंचित बहुजन आघाडीने (VBA) यावर्षी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे भव्य “संविधान सन्मान महासभा” आयोजित केली आहे. या महासभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह देशभरातील अनेक महत्त्वपूर्ण मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत झाली घोषणा
या महासभेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी आणि युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी महासभेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, “२५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण भारतीय लोकशाहीसाठी दिशादर्शक होते. संविधान लागू होण्यापूर्वीच त्यांनी देशाला योग्य दिशा दिली होती.”
बाबासाहेबांनी दिलेले तीन प्रमुख इशारे
अहिरे यांनी डॉ. आंबेडकरांनी त्या भाषणातून दिलेल्या तीन प्रमुख इशाऱ्यांची आठवण करून दिली:
- व्यक्तीपूजा टाळा: लोकशाहीचा उपयोग व्यक्तीपूजेसाठी करू नका आणि कुणालाही देवासारखा मानू नका.
- लोकशाहीचे रूपांतर: राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत करणे अत्यावश्यक आहे.
- स्वातंत्र्याचा धोका: जातिभेद, अन्याय आणि जुन्या सामाजिक रूढी टिकवल्यास देशाला मिळालेले स्वातंत्र्य पुन्हा हरवू शकते.
संविधान रक्षणासाठी एल्गार
सध्या देशात संविधानविरोधी वातावरण तयार होत असल्याचा आणि राज्यकर्ते संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, “संविधान सन्मान महासभेद्वारे देशाला पुन्हा एकदा दाखवून देऊ की, हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालेल, मनुवादाने नाही,” असे अहिरे यांनी ठणकावून सांगितले.
गेल्या वर्षी, २५ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या महासभेला सुमारे एक लाख फुले-शाहू-आंबेडकरवादी जनता उपस्थित होती. यंदाची सभा त्याहून अधिक मोठी आणि प्रभावी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या महासभेला उपस्थित राहणाऱ्या देशभरातील इतर महत्त्वाच्या मान्यवरांच्या नावांची घोषणा लवकरच केली जाईल.
