उघड्या डीपी मुळे पाच वर्षांची चिमुकली गंभीर जखमी
प्रतिनिधी — नारायण कांबळे
हातकणंगले तालुका इचलकरंजी मधील लिंबू चौक परिसरात खेळत असताना पाच वर्षांची राधिका रमेश चव्हाण ही चिमुकली महावितरणच्या सताड उघड्या डीपीला चिकटल्याने गंभीर जखमी झाली. वीजेच्या तीव्र धक्क्यामुळे राधिकाच्या हातापायांवर मोठ्या प्रमाणात भाजल्या गेल्या असून, तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अब्दुललाट येथील राधिका दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मामाकडे — रोहित कांबळे यांच्या घरी, मथुरा हायस्कूलसमोर आली होती. शनिवारी दुपारी ती काही मुलांसोबत खेळत असताना परिसरातील 11 हजार व्होल्टच्या डीपीकडे खेचली गेली आणि विजेच्या झटक्याने दूर फेकली गेली. या घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ तिला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले.
अपघातानंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला. परंतु जबाबदार अधिकारी तब्बल दोन तास उशिरा आल्याने संतप्त नागरिकांनी त्यांचा घेराव घालत जाब विचारला. परिसरातील डीपीचे झाकण गंजलेले, तारा निकृष्ट अवस्थेत आणि कोणतेही सुरक्षा कुंपण नसल्याने स्थानिक नागरिकांनी याआधीही अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने आज हा गंभीर प्रकार घडल्याची चर्चा होती.
राधिकाचे वडील रमेश चव्हाण हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी महावितरणकडून तत्काळ नुकसानभरपाई, आर्थिक मदत आणि उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
