मद्य वाहनांसह साडे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची धडक कारवाई
अमोल कुरणे
कोल्हापूर, दि. ४ (प्रतिनिधी) – राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने भुदरगड तालुक्यातील मडिलगे येथे मोठी कारवाई करत गोवा बनावटीची विदेशी मद्याचे एकूण २८ बॉक्स जप्त केले. या धडक कारवाईत मद्य वाहनांसह अंदाजे ६,६१,६८० (सहा लाख एकसष्ट हजार सहाशे ऐंशी) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मडीलगे (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) परिसरात सुझुकी स्विफ्ट (MH 10 BM 9361) या वाहनातून अवैध मद्याची वाहतूक होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने तात्काळ छापा टाकून वाहनासह मोठ्या प्रमाणात असलेले मद्य जप्त केले.
आरोपीला अटक, तीन गुन्हे नोंद
या प्रकरणी संशयित आरोपी तानाजी रंगराव उगले (वय ३४), रा. मडिलगे बुद्रुक ता. भुदरगड यांस अटक करण्यात आली असून, त्याच्यावर तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशाने निरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर. एम. पाटील, एस. पी. डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, जवान मारुती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, योगेश शेलार, आणि राहुल कुटे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. एम. पाटील करत आहेत.
चौकट – जप्त मुद्देमालाचा तपशील
| वस्तू | अंदाजे किंमत (रु.) |
|---|---|
| मद्याची अंदाजे किंमत (२८ बॉक्स) | १,८१,६८० |
| सुझुकी स्विफ्ट वाहन (MH 10 BM 9361) | ४,८०,००० |
| जप्त मुद्देमाल अंदाजे एकूण किंमत | ६,६१,६८० |
