एनसीसी’ अधिकाऱ्यांच्या देशसेवेला सलाम; मुंबईत १४ डिसेंबरला भव्य सन्मान सोहळा.
२५ वर्षे अविरत देशसेवा करणाऱ्या विजय अवसरमोल यांच्यासह मान्यवरांचा होणार गौरव; असोसिएट एनसीसी ऑफिसर वेल्फेअर बोर्डाचा स्तुत्य उपक्रम.
मुंबई (विशेष प्रतिनिधी: उदय नरे):
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीचे बीज रोवणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) अधिकाऱ्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी मुंबईत एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएट एनसीसी ऑफिसर वेल्फेअर बोर्ड, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी सन्मान सोहळा’ येत्या १४ डिसेंबर २०२५ रोजी नेहरू नगर, कुर्ला येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे.
विजय अवसरमोल: एनसीसीची ‘खरी संपत्ती’
या सन्मान सोहळ्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल (अंधेरी) चे फर्स्ट ऑफिसर विजय अवसरमोल यांचा होणारा गौरव. क्रीडा विभाग प्रमुख (HOD) म्हणून २८ वर्षे आणि एनसीसी अधिकारी म्हणून २५ वर्षे अशी प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवा त्यांनी बजावली आहे.
सन २००० मध्ये कामठी येथून ‘डायरेक्ट कमिशन’ आणि २००२ मध्ये ‘रिफ्रेशर कोर्स’ पूर्ण केलेल्या अवसरमोल यांनी एक समर्पित अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ कवायत आणि परेडपुरते मर्यादित न राहता त्यांनी समाजसेवा, वाहतूक नियंत्रण, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये समाजभान रुजवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यासह विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एनसीसीसाठी ‘खरी संपत्ती’ असलेल्या आणि तरुणांचे प्रेरणास्थान ठरलेल्या विजय अवसरमोल यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान केला जाणार आहे.
या मान्यवरांचाही होणार गौरव
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक संदीप गोसावी आणि विश्वनाथ पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीसी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खालील अधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात येईल:
मेजर डॉ. संजय चौधरी
चीफ ऑफिसर राजेश चव्हाण
चीफ ऑफिसर डी. टी. पारेख
चीफ ऑफिसर सुषमा बंधछोडे
चीफ ऑफिसर राजेंद्र उपाध्याय
कार्यक्रमाचा उद्देश
एनसीसी अधिकारी केवळ प्रशिक्षण देत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय बांधिलकीची भावना जागृत करतात. त्यांच्या याच निष्ठा आणि सेवाभावाचा गौरव करणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्यासाठी मुंबईतील अनेक एनसीसी अधिकारी, मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Related