कोल्हापूर चा सामाजिक बदल : बिंदू चौकातील बाबासाहेबांचा पुतळा ७५ वर्षाची साक्ष
- प्रा.सौ. एस. पी . सोरटे
ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ९ डिसेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने प्रासंगिक लेख
सन १९४९ – ५० मध्ये भारत देश स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करत असताना डॉ. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचे वारे संपूर्ण देशात वाहत होते. डॉ. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी थोर समाज सुधारक माधवराव बागल यांनी कोल्हापूर च्या ऐतिहासिक बिंदू चौकात ९ डिसेंबर १९५० रोजी भव्य कार्यक्रम घेऊन सामान्य नागरिकांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
डॉ. आंबेडकरांच्या हयातीतील पहिला पुतळा हा पुतळा केवळ स्मारक नाही तर सामाजिक न्यायाच्या चळवळीचा जिवंत दस्ताऐवज आहे. गेल्या ७५ वर्षात या पुतळ्याने असंख्य आंदोलन, जनजागृती, शिक्षण मोहिमा, सांस्कृतिक बदल आणि लोक चळवळी पाहिल्या आहेत. हा पुतळा म्हणजे कोल्हापूरच्या सामाजिक परिवर्तनाचा साक्षीदार, प्रेरणास्थान आणि ओळख आहे. या संपूर्ण प्रवासाकडे चार प्रमुख अंगाने पाहता येते.
१ ) बाबासाहेबांच्या विचारांचे जिवंत प्रतीक :
बाबासाहेबांचा हा पुतळा म्हणजे शारीरिक प्रतिमा नाही तर तो विचारांचा प्रकाशस्तंभ आहे बाबासाहेबांचे विचार हे आधुनिक भारताच्या पुनर्रचनेचे केंद्र आहे. समता, बंधुता, न्याय, वैचारिक स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण आणि स्वाभिमान या मूल्यांची सतत आठवण समाजाला या पुतळ्याने मिळते. बिंदू चौकातील हे स्मारक समाजाला रोजच सांगते की ज्ञानाशिवाय उद्धार नाही आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी कामगार, कष्टकरी कोणत्याही अन्यायाची घटना घडली की या पुतळ्यासमोर एकत्र येत असतात त्यामुळे या स्मारकाने “न्यायनमुख सामाजिक अभिव्यक्तीचे केंद्र ” म्हणून स्थान मिळवले आहे. पुतळा समाजाला आठवण करून देतो की प्रगतीचा मार्ग हा शिक्षण संघर्ष आणि संकटातूनच जातो.
२ ) पुतळ्याच्या उभारणी मागील ऐतिहासिक पार्श्वभूमी :
स्वातंत्र्यानंतर देशामध्ये शिक्षणाचा अभाव, जातीभेद आणि आर्थिक विषमता तीव्र होती या पार्श्वभूमीमुळे पुतळा उभारणी म्हणजे सामाजिक धौर्यचे प्रतीक होते. कोल्हापूरातील जागरूक समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी लोकसहभागातून एका महापुरुषाची प्रतिमा जतन करणे हे त्या काळातील सामाजिक जागरूकतेचे दर्शन घडवते पुतळा उभारणे म्हणजे बाबासाहेबांना श्रद्धांजली नव्हे तर नव्या विचारांना सार्वजनिक स्थान देणे असे होते.
३ ) सामाजिक न्याय आणि स्वाभिमानाचे प्रेरणास्थान :
७५ वर्षापासून हा पुतळा कोल्हापूर मधील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा केंद्रबिंदू राहिला आहे. संविधान दिन, जयंती, महापरिनिर्वाण दिन, वाचक चळवळी, युवकांच्या सभा,स्त्रीशक्ती उपक्रम, विद्यार्थी संघटनांच्या सभा या सर्वांची पावले नैसर्गिकपणे या पुतळ्याकडे वळतात. या ठिकाणी होणारे कार्यक्रम लोकशाही मूल्यांचे प्रशिक्षण बनत आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी ही मूर्ती म्हणजे प्रेरणास्थान आहे. या पुतळ्यासमोर लोक आत्मविश्वास जागृत करतात. समाजातील अन्याया विरोधात लढण्याची शपथ घेतात. बाबासाहेबांनी दिलेले “शिका, संघटित ,व्हा संघर्ष करा “हे तीन मूलमंत्र इथल्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचले याचे मुख्य कारण हा पुतळाच आहे.
४ ) सांस्कृतिक ओळख आणि लोकसहभागाचे केंद्र :
बिंदू चौकातील पुतळा कोल्हापूरच्या सांस्कृतिक चेतनेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या पुतळ्याभोवती अनेक वाचनालय, सामाजिक संस्थांचे कार्यक्रम, युवकांचे उपक्रम अभ्यास वर्ग संविधान वाचन मोहीम अशा अनेक क्रियांना प्रवाह मिळाला आहे. लोक येथे एकत्र येऊन शांतता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षतेची प्रतिज्ञा करतात शहरातील प्रत्येक पिढीच्या भावनांमध्ये या स्मारकाचा साक्षात सहभाग असल्याने तो फक्त पुतळा नसून एक जन चळवळीचे जिवंत केंद्र बनला आहे. यामुळे कोल्हापूरची ओळख प्रगतशील शहर म्हणून अधिक दृढ झाली आहे. हा पुतळा म्हणजे कोल्हापूरचा सामाजिक इतिहास उभा करण्याची वास्तू नाही तर ती सात दशके जोपासलेल्या समाज जागृतीची जिवंत साक्ष आहे बाबासाहेबांच्या विचारांना सार्वजनिक जीवनात दृढपणे उरवणारे हे स्मारक आजही तितकेच प्रभावी, तितकेच प्रेरणादायी आणि तितकेच आवश्यक आहे सामाजिक न्याय ,समता आणि आत्मविश्वासाचा ७५ वर्षाचा प्रवास या पुतळ्याने पाहिला आहे आणि म्हणूनच येणाऱ्या पिढ्यांना बिंदू चौकातील हा बाबासाहेबांचा स्टॅच्यू मार्गदर्शन करत राहील.
