राधानगरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा मोठा दणका; २७ हजारांची लाच घेताना मंडलधिकारी जाळ्यात
कोल्हापूर:
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील मंडलधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे (वय ४७) यांना २७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहात पकडले. सातबारा पत्रकी नाव नोंदवण्यासाठी आणि इतर प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी त्यांनी ही लाचेची मागणी केली होती.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार (वय ४०) यांची अर्जुनवाडा येथील गट क्रमांक ४७९ मध्ये शेतजमीन आहे. या जमिनीच्या सातबारा पत्रकी नाव लावण्यासाठी तक्रारदार मंडलधिकारी कार्यालयात गेले होते. यावेळी आरोपी मंडलधिकारी कुलदीप जनवाडे यांनी तक्रारदाराकडे स्वतःच्या कामासाठी ७,००० रुपये आणि ते पाठपुरावा करत असलेल्या इतर ४ प्रकरणांसाठी २०,००० रुपये, अशी एकूण २७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने १९ डिसेंबर रोजी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. विभागामार्फत १९ आणि २० डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
आज, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कसबा वाळवे येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जनवाडे यांना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
घरझडती आणि पुढील कारवाई
कारवाईनंतर आरोपीच्या कार्यालयाची पंचासमक्ष झडती घेण्यात आली असून, तपासासाठी त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच, कोल्हापूर येथील फुलेवाडी रिंग रोड भागातील त्यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यासाठी एसीबीचे पथक रवाना झाले असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, पोलीस कर्मचारी विकास माने, सचिन पाटील आणि उदय पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली.

