इचलकरंजीत सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन ‘स्मृतीजागर’चा रविवारी दिमाखदार समारोप
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांची प्रमुख उपस्थिती; वर्षभराच्या साहित्यिक उपक्रमांची होणार सांगता
इचलकरंजी:
इचलकरंजीच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदल्या गेलेल्या १९७४ च्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या ‘सुवर्ण महोत्सवी स्मृतीजागर’ मोहिमेचा सांगता समारंभ रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री मा. प्रकाशअण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होईल. यावेळी लातूरचे पोलीस उपअधीक्षक तथा प्रसिद्ध कवी समीरसिंह साळवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
वर्षभराचा यशस्वी प्रवास
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली २६ ते २८ डिसेंबर १९७४ रोजी इचलकरंजीत पार पडलेल्या साहित्य संमेलनाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा स्मृतीजागर उपक्रम राबवण्यात आला. गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग ११ वैविध्यपूर्ण साहित्यिक कार्यक्रम घेण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या १०० वर्षांच्या इतिहासात अशा प्रकारचा वर्षभर चालणारा स्मृतीजागर उपक्रम राबवणारी इचलकरंजी ही पहिली नगरी ठरली असून, याची दखल संपूर्ण महाराष्ट्र साहित्य वर्तुळात घेतली गेली आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
- दिनांक: रविवार, २८ डिसेंबर २०२५
- वेळ: सकाळी ९:३० वाजता
- स्थळ: श्री गजानन महाराज मंदिर सभागृह, सांगली रोड, खोतवाडी, इचलकरंजी.
या सांगता समारंभास इचलकरंजी व परिसरातील साहित्य रसिक, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्मृतीजागरचे संकल्पक दिलीप शेंडे, प्रसाद कुलकर्णी, प्रा. रोहित शिंगे, ॲड. माधुरी काजवे आणि वैशाली नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
