अनुसूचित जाती उपयोजनेच्या निधीसाठी पँथर आर्मी आक्रमक; २९ डिसेंबरला हातकणंगले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
हातकणंगले: प्रतिनिधी
अनुसूचित जाती उपयोजनेचा (SCSP) निधी राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ११.८०% करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी हातकणंगले तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
या आंदोलनाबाबतचे निवेदन जिल्हा शाखा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर श्री. संजय कांबळे ,नितेश कुमार दिक्षांत व सहकाऱ्यांनी तहसील प्रशासनाला दिले होते. या निवेदनाची दखल घेत तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी सदर मागणी पुढील कार्यवाहीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली आहे.
प्रमुख मागण्या:
निधीत वाढ: अनुसूचित जाती उपयोजनेसाठी (SCSP) राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ११.८०% निधीची तरतूद करावी.
गैरवापर रोखणे: या निधीचा होणारा गैरवापर तातडीने थांबवण्यात यावा.
निवड निकषात बदल: वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दारिद्र्य रेषेच्या (BPL) निकषाऐवजी सामाजिक आर्थिक जनगणना (SECC-2011) हा आधार ग्राह्य धरावा.
प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन
पँथर आर्मीने पुकारलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, तहसीलदार कार्यालयाने हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले आहे. “तुमच्या मागण्यांवर योग्य कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आले आहे, तरी आपण २९ तारखेचे लाक्षणिक उपोषण करू नये,” असे आवाहन तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी पँथर आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केले आहे.
दरम्यान, पँथर आर्मीचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी पोलीस प्रशासनाला पत्राद्वारे कळवले आहे की, हे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पार पडेल [user text]. या आंदोलनामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

