नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या १००० विधवांना लाभ मंजूर; ‘प्रतिज्ञापत्रा’साठी आता स्टॅम्पची अट रद्द
मुंबई | विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने राज्यातील कामगारांच्या वारसांसाठी दोन मोठे आणि दिलासादायक निर्णय घेतले आहेत. नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर ओळखपत्र जीवित नसल्याने प्रलंबित राहिलेल्या १९०० अर्जांपैकी १००० अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, यापुढे कोणत्याही लाभासाठी अर्ज करताना विधवा महिला किंवा वारसांना प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासणार नाही, असे महत्त्वपूर्ण आदेश मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी दिले आहेत.
प्रलंबित अर्जांचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य निमंत्रक कॉ. शंकर पुजारी यांनी २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनासंदर्भात ३० डिसेंबर रोजी सचिव विवेक कुंभार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी कुंभार यांनी सांगितले की, ज्या कामगारांचे निधन झाले आहे परंतु ओळखपत्र ‘रिन्यू’ नसल्याने ऑनलाइन अर्ज भरता येत नव्हते, अशा १९०० हून अधिक ऑफलाईन अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. त्यापैकी कागदपत्रांची पूर्तता केलेल्या १००० हून अधिक अर्जांना आज मंजुरी देण्यात येत आहे.
महत्त्वाचे निर्णय आणि सुधारणा:
- स्टॅम्पची गरज नाही: विधवा महिला किंवा वारसांना आता लाभाच्या अर्जासोबत स्टॅम्प पेपर जोडण्याची गरज नाही. तसे स्पष्ट आदेश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले असून त्याची प्रतही कॉ. पुजारी यांना सुपुर्द करण्यात आली आहे.
- प्रलंबित अर्जांचा निपटारा: तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेले सर्व अर्ज एकाच वेळी निर्णय प्रक्रियेत घेऊन त्यावर लवकरच सकारात्मक निकाल दिला जाईल.
- ऑनलाइन सिस्टीममध्ये बदल: आधार कार्ड क्रमांक किंवा स्पेलिंगमधील चुकांमुळे अर्ज बाद होऊ नयेत, यासाठी ऑनलाइन प्रक्रियेत सुधारणा केली जात आहे. दुरुस्तीसाठी दिलेल्या अर्जांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल.
- लोकसेवा हक्क हमी कायदा: मंडळाची ऑनलाइन प्रक्रिया आणि ‘आपले सरकार’ पोर्टल यामध्ये सुसंगतता आणण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, जेणेकरून कामात अधिक पारदर्शकता येईल.
