‘हुजूर रेस्ट हाऊस’ येथे शाहू-भीम संयुक्त स्मारक करा; प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिले पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन
कोल्हापूर (प्रतिनिधी):
करवीर नगरीचे लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे आलेले पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची सर्किट हाऊस येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान, ऐतिहासिक ‘हुजूर रेस्ट हाऊस’ या इमारतीच्या ठिकाणी ‘शाहू-भीम संयुक्त स्मारक’ उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर करण्यात आले.
इमारतीचा ऐतिहासिक वारसा आणि महत्त्व
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने २१ आणि २२ मार्च १९२० रोजी माणगाव येथे पहिली ऐतिहासिक ‘अखिल भारतीय बहिष्कृत परिषद’ पार पडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनातील हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. या परिषदेच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा कोल्हापुरात आले, तेव्हा छ. शाहू महाराजांनी त्यांच्या वास्तव्याची सोय आपल्या ‘हुजूर रेस्ट हाऊस’ या इमारतीत केली होती.
या दोन्ही महामानवांचा प्रदीर्घ सहवास आणि पदस्पर्श या इमारतीला लाभल्यामुळे या जागेला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या पवित्र जागी ‘शाहू-भीम संयुक्त स्मारक’ व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेची आग्रही मागणी आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
सध्या हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित आणि अडगळीत पडला आहे. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन, स्मारकाच्या रूपाने या दोन महामानवांच्या भेटीच्या स्मृती जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता प्रा. कवाडे सरांच्या नेतृत्वाखाली ‘शाहू-भीम स्मारक निर्माण कृती समिती’ आणि ‘पीपल्स रिपब्लिकन पक्षा’च्या वतीने हे निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे, प्रा. कवाडे यांनी यापूर्वी आमदार असताना विधान परिषदेतही हा प्रश्न लावून धरला होता.
पालकमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन
निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून, शाहू-भीम संयुक्त स्मारकाच्या संदर्भात लवकरच प्रशासनाची विशेष आढावा बैठक घेणार असल्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
मान्यवरांची उपस्थिती
निवेदन देताना स्मारक निर्माण कृती समितीचे निमंत्रक विद्याधर कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, अशोक कांबळे, जितेंद्र कांबळे, विश्वास कांबळे, श्रीमंत कांबळे, सौ. माधुरी कांबळे, राकेश चौगुले, रवींद्र कांबळे, मोहन शिंगाडे, नामदेव जाधव, शरद कांबळे, अशोक कुरणे, मिलिंद गोंधळी यांच्यासह पक्षाचे व कृती समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
