शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक!
कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी): वारस हक्काची आणि फेरफारची नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना शिरोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार संजय बापू तेली (वय ५२, रा. आळते, ता. हातकणंगले) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमके काय घडले?
तक्रारदार यांच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर वारस आणि फेरफार नोंद करण्यासाठी त्यांनी शिरोळ येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. हे काम निमतानदार संजय बापू तेली यांच्याकडे प्रलंबित होते. तक्रारदार या कामासाठी तेली यांना भेटले असता, त्यांनी वारस आणि फेरफार नोंद करण्यासाठी २,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीने रचला सापळा
तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, तेली यांनी २,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून २,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना संजय तेली यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
कारवाई पथक
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कोल्हापूर एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस अंमलदार सुधीर पाटील, कृष्णा पाटील, संदीप पवार आणि रवींद्र पाटील यांनी ही यशस्वी कारवाई केली.
नागरिकांना आवाहन: > सरकारी कामासाठी कोणीही लाच मागत असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे:
- टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक: १०६४ किंवा १८००२२२०२१
- पुणे परिक्षेत्र कार्यालय: ०२०-२६१२२१३४
- कोल्हापूर एसीबी कार्यालय: ९७६४१४०७७७ / ९४०४३२१०६४
