६३ हजारांचा मद्य मुद्देमाल जप्त: करवीर पोलिसांची धडक कारवाई
मांढरे येथे गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा हस्तगत; दोघांना अटक
कोल्हापूर, दि. ३० (प्रतिनिधी) :
करवीर तालुक्यातील मांढरे गावात गोठ्याच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्री करणाऱ्या टोळीचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ६३ हजार ८४० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे कडक आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या आदेशान्वये करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे परिसरात लक्ष ठेवून असताना, त्यांना मांढरे येथील सर्जेराव जगताप हा तरुण बेकायदा दारूविक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
गोठ्याजवळ रचला सापळा
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर व त्यांच्या पथकाने मांढरे गावात तातडीने सापळा रचला. गावातील संशयित विजय मारुती पोवार याच्या जनावरांच्या गोठ्याजवळ दबा धरून बसलेल्या पथकाला सर्जेराव जगताप हा खाकी रंगाच्या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या घेऊन बसल्याचे दिसून आले. पोलिसांनी कोणतीही संधी न देता तात्काळ छापा टाकून त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
दोघांना अटक, गुन्हा दाखल
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत संशयित आरोपी सर्जेराव सखाराम जगताप (वय ४०, रा. मांढरे) याने, विजय मारुती पोवार (वय ३१, रा. माळवाडी, मांढरे) याच्या मदतीने जनावरांच्या गोठ्यात चोरून दारूविक्रीचा धंदा चालवत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून करवीर पोलीस ठाण्यात आणले असून, त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत’ गुन्हा दाखल केला आहे.
कारवाई करणारे पथक:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोहेकॉ सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सोमराज पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, रणजित पाटील आणि प्रकाश कांबळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ विजय तळसकर करत आहेत.
