सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ३८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची शाहूवाडीत मोठी कारवाई

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ३८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची शाहूवाडीत मोठी कारवाई

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ३८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची शाहूवाडीत मोठी कारवाई

शाहूवाडी (प्रतिनिधी):
सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) शाहूवाडी येथील शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे (वय ५०) याला रंगेहाथ लाच स्वीकारताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पकडले. रस्ते आणि पुलाच्या कामांचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात ३८,००० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बिलांच्या मंजुरीसाठी मागितली लाच

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभाग शाहूवाडी मार्फत निघणारे रस्ते, गटारी व पुलांची कामे मुख्य ठेकेदाराकडून सब-ठेकेदार म्हणून घेऊन पूर्ण करून देतात. त्यांनी शिराळे वारून येथील ब्रिजचे काम आणि कर्नाळवाडी (धनगरवाडा) ते सोनारवाडी (विरळे) गावातील दोन किलोमीटर रस्त्याचे मुरमीकरण व खडीकरणाचे काम केले होते.
या दोन्ही कामांचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात शाखा अभियंता विजयकुमार वनमोरे यांनी सुरुवातीला ३४,७०० रुपयांची मागणी केली होती. या प्रकारानंतर तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) रीतसर तक्रार नोंदवली.

एसीबीच्या पडताळणीत ३८ हजारांची मागणी निष्पन्न

तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान वनमोरे आणि तक्रारदार यांच्यात कामाच्या बिलाबाबत चर्चा झाली, ज्यामध्ये वनमोरे यांनी दोन्ही कामांचे बिल मंजूर करून दिल्याचे सांगत ३८,००० रुपयांची लाच मागून ती घेऊन येण्यास सांगितले.

सापळा रचून रंगेहाथ अटक

लाचेची मागणी निश्चित झाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाहूवाडी येथे सापळा कारवाई आयोजित केली. पंच साक्षीदारांच्या समक्ष आरोपी लोकसेवक विजयकुमार विलास वनमोरे याने तक्रारदाराकडून ३८,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने वनमोरे याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
आरोपी विजयकुमार वनमोरे हा मूळचा कराड (जि. सातारा) येथील कोयना वसाहतीमधील संजय अपार्टमेंटचा रहिवासी असून, सध्या तो शाहूवाडी येथील अकोली रोड येथे कार्यरत व वास्तव्यास आहे.

या पथकाने केली कारवाई

सदरची धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली. कोल्हापूर एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस हेकॉ विकास माने, संदीप काशीद, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील आणि चालक प्रशांत दावणे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

नागरिकांना आवाहन:
शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवाने लाचेची मागणी केल्यास अथवा अपसंपदेबाबत माहिती असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

  • टोल फ्री क्रमांक: १०६४ / १८००२२२०२१
  • पुणे परिक्षेत्र कार्यालय: ०२०-२६१२२१३४ / २६१३२८०२
  • पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर (वैष्णवी पाटील): ९७६४१४०७७७ / ९४०४३२१०६४, कार्यालयीन फोन: ०२३१-२५४०९८९.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *