कोल्हापूर : जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी या मागणीसाठी हलकर्णी येथील भेंडुलकर कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेय. आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होतोय.
अनुसया मारुती भेंडूलकर या चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील रहिवाशी आहेत. त्या पाटणे येथील श्रीधर नाडगौडा यांच्या शेत जमिनीमध्ये १९४२ पासून कुळ म्हणून जमीन कसत आहेत. भेंडूलकर यांच्याबरोबर अन्य खातेदारही आहेत. परंतु तलाठी, सर्कल यांना हाताशी धरून श्रीधर नाडगौडा यांनी कुळांना कोणतीही समज अथवा नोटीस न देता जमिनीची २५ ते ३० लाख रुपयांना विक्री केली. सदरची विक्री ही बेकायदेशीर प्रकारे केल्याने चंदगड तहसीलदार यांच्याकडे सादर शेत जमिनीचा विक्री व्यवहार रद्द यासाठी वेळोवेळी निवेदने, पत्र व्यवहार आणि उपोषणे करूनही तहसीलदार यांनी दुर्लक्ष केल्यामुळे न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. जमिनीची विक्री करणारे आणि घेणारे यांच्याकडून वाहिवाटीस असलेल्या कुळांना दमदाटी केली जात असून संबंधितावर फौजदारी कारवाई करावी, जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी भेंडूलकर कुटुंबीयाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलंय. आंदोलनाचा आजचा हा चौथा दिवस आहे. ६५ वर्षीय विधवा महिलेच्या सुरु असलेल्या धरणे आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जातोय.