रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे 15 जानेवारी रोजी 9 जिवंत गावठी बॉम्बची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना गावठी बाँब पुरवणाऱ्या आणखी दोघांना वेंगुर्ला येथून अटक करण्यात आली होती. चौघांनाही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. संशयितानी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या चौघांचीही 15 हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली.
नारायण ऊर्फ दर्शन गणेश चव्हाण (22), पांडुरंग यशवंत परब (35), रामा सुरेश पालयेकर (22) व श्रीकृष्ण केशव हळदणकर (24, चौघे ऱा. वेंगुर्ला सिंधुदुर्ग) अशी त्यांची नावे आहेत. या चौघांना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून गावठी बॉम्ब देखील ताब्यात घेण्यात आले होते. या गावठी बॉम्बचा वापर वन्य प्राण्यांच्या शिकारी होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.