‘व्हॅलेंटाईन डे’ ची ऐतिहासिक सुरवात
फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमाचे वारे साहजिकच वाहायला लागतात. व्हॅलेंडाईन डे हा एकच दिवस असतो. मात्र जवळजवळ महिनाभर याचे सेलिब्रेशन चालू असते. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर येणारा हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे कितीतरी जणांसाठी अगदी महत्त्वाचा दिवस असतो. व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय अथवा व्हॅलेंटाईन डे ची माहिती ही तशी तर प्रत्येकाला प्रेमाच्या दृष्टीकोनातून असतेच. व्हॅलेंटाईन डे अर्थात हा दिवस का साजरा करतात आणि याचे महत्त्व काय आहे? व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय? हे अगदी लहान मुलांपासून सर्वांना माहीत आहे, पण नक्की त्याचा इतिहास काय आहे आणि कधीपासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला?
खरं तर आयुष्यातील प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा व्हायला हवा आणि हे अनेक जण आपल्या आयुष्यात करतात देखील. जगातील प्रत्येक बंधन हे प्रेमाने बांधलेले असते. जर प्रेम नसेल तर आयुष्यात आनंद येऊ शकणार नाही. तसंच प्रेमाबाबत आपल्या मनातील गोष्टी या समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी कोणताही मुहूर्त नसतो. प्रेमाचा आदर करणे, प्रेमाची भावना हा एक सुंदर अनुभव आहे. एकमेकांबरोबर आयुष्य काढताना अनेक चढउतार तर येतातच. पण त्याग, विश्वास आणि प्रेमाने हे आयुष्य एकत्र अप्रतिमरित्या निघून जाते आणि त्याच प्रेमाचा वारंवार आठवण करून देणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. जे प्रेम तुम्ही तुमच्या मनात सतत अनुभवता तेच तुम्ही ज्या व्यक्तीवर करता त्यांना सांगणे म्हणजे व्हॅलेंटाईन डे. पण हे शब्दात मांडणे नक्कीच सोपे नाही.
अशाच प्रेमाचा हा अनुभव जेव्हा एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यात येतो, त्या दिवसाला व्हॅलेंटाईन डे असं म्हटलं जातं. हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आयुष्यात प्रेम म्हणजेच सर्व काही आहे आणि त्यासाठी वेळ काढणंही महत्त्वाचे आहे. सध्या वेळेची कमतरता खूपच भासते आणि म्हणूनच प्रेमाचा हा एक दिवस प्रेमी युगुलांना एकत्र वेळ देण्यासाठी योग्य ठरतो. कारण वेळ निघून गेली तर ती परत येणार नाही हेच हा दिवस सांगत असतो. दिवाली, रक्षाबंधन, ख्रिसमस, होळी हे सण ज्याप्रमाणे साजरे करण्यात येतात, त्याप्रमाणेच प्रेमाचा हा दिवस सण म्हणूनच हल्ली साजरा करण्यात येतो. कारण प्रेमासाठीही आता विशेष दिवस साजरा करण्याची वेळ आली आहे आणि तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे. या दिवशी प्रपोज करण्यात येते आणि आपल्या प्रेमाच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यात येतात.
तसं तर व्हॅलेंटाईन डे ची माहिती सर्वांना आहे. पण व्हॅलेंटाईन डे चा इतिहास आणि त्याचा संरक्षक संत याची कथा फारच कमी जणांना माहीत आहे. आणि ती अगदी रहस्याने भरलेली आहे. आपल्याला माहीत आहे की फेब्रुवारी महिना हा अनेक वर्षांपासून रोमान्सचा महिना म्हणून ओळखला जातो आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यामागे ईसाई आणि प्राचीन रोमन परंपरा दोन्ही आहेत. पण संत व्हॅलेंटाईन नक्की कोण होते आणि त्यांच्याशी प्राचीन संस्कार कसे जोडले गेले? असा प्रश्न येतो. तर कॅथलिक चर्च व्हॅलेंटाईन नावाच्या तीन वेगवेगळ्या संतांविषयी सांगतात. एका कथेनुसार व्हॅलेंटाईन एक पादरी होते जे रोमच्या तिस-या शतकादरम्यान चर्चमध्ये कार्यरत होते. जेव्हा सम्राट क्लॉडियस दुसरा याने पाहिले की, सेनेमध्ये अविवाहीत असणारे सैनिक अधिक काम करतात. तेव्हा त्याने युवा पुरुषांवर लग्न न करण्यासाठी दबाव आणला. संत व्हॅलेंटाईन यांनी या अन्यायाला वाचा फोडली आणि गुप्त पद्धतीने युवा प्रेमींचे विवाह करून देणे चालू ठेवले. जेव्हा याबाबत राजाला माहिती मिळाली तेव्हा क्लॉडियसने संत व्हॅलेंटाईन यांना मृत्यूदंड दिला.
तर काही प्रचलित कथेनुसार संत व्हॅलेंटाईन यांना तुरूंगात डांबून ठेवण्यात आले होते आणि त्यांनी तिथून जेलरच्या मुलीला एक पत्र लिहिले. ती मुलगी संत व्हॅलेंटाईन यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. या पत्राच्या शेवटी ‘From You Valentine’ असे लिहिण्यात आले होते. तर एका मान्यतेनुसार, जेलरच्या मुलीला डोळ्यांनी पाहता येत नव्हते आणि संत व्हॅलेंटाईच्या प्रार्थना आणि चमत्कारामुळे तिला दिसू लागले होते. त्यामुळे हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो असे समजण्यात येते.
वर्ष 496 मध्ये पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला असे सांगण्यात येते. व्हॅलेंटाईन डे ची सुरूवात ही एका रोमन फेस्टिव्हलमधून झाली होती. 5 व्या शतकाच्या शेवटपर्यंत पोप गॅलेसियसने 14 फेब्रुवारी हा दिवस सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केला होता आणि आता हा दिवस संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. काही व्यक्तींच्या म्हणण्यानुसार व्हॅलेंटाईन डे हा संत व्हॅलेंटाईनच्या पुण्यतिथीच्या दिवशी साजरा करण्यात येतो, जी इ. स. 270 च्या आसपास होती असे सांगण्यात येते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या चर्चा आणि गोष्टी या दिवसाच्या सांगण्यात येतात. पण तेव्हापासून हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या प्रेमाबाबत मनात असणारी हुरहूर, प्रेमाची भावना ही आपल्या प्रियकर अथवा प्रेयसीकडे व्यक्त करण्यात येते. इतकंच नाही तर भेट म्हणून लाल गुलाबही या दिवशी देण्यात येते. दरम्यान आता गेले काही वर्ष 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा संपूर्ण प्रेमाचा आठवडाच साजरा करण्यात येत असल्याचे दिसून आले आहेत. व्हॅलेंटाईन डे च्या एक आठवडा आधीपासूनच प्रेमाच्या या दिवसांना सुरूवात होते. नक्की कोणकोणते दिवस साजरे करण्यात येतात.
7 फेब्रुवारी या दिवसाला ‘रोझ डे’ असं म्हणतात. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला या दिवशी गुलाब देण्यात येते. गुलाबाच्या रंगानुसार याचा अर्थही आहे. पांढरे गुलाब- पांढऱ्या गुलाबाचा अर्थ मला माफ कर, पिवले गुलाब- पिवळ्या गुलाबाचा अर्थ तू माझा अत्यंत जवळचा किंवा जवळची मित्र-मैत्रीण आहेस, गुलाबी गुलाब- गुलाबी गुलाबाचा अर्थ तू मला आवडते किंवा आवडतोस आणि लाल गुलाब- लाल गुलाबाचा अर्थ माझं तुझ्यावर प्रेम आहे
8 फेब्रुवारी या दिवसाला ‘प्रपोझ डे’ साजरा करण्यात येतो. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्या व्यक्तीला मनातील भावना सांगण्यात येते. हा दिवस अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती केल्या जातात, जेणेकरून प्रपोज डे कायम लक्षात राहील. ज्यांना समोर भावना वक्त करण्याची भीती असते ते प्रपोझ डे संदेश पाठवून भावना व्यक्त करतात.
9 फेब्रुवारी या दिवसाला ‘चॉकलेट डे’ साजरा करण्यात येतो. एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगून झाल्यावर तोंड गोड करायची पद्धत विसरून कसं बरं चालेल? त्यामुळे हा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा करण्यात येतो.
10 फेब्रुवारी या दिवसाला ‘टेडी बेअर डे’ साजरा करण्यात येतो. या दिवशी एकमेकांच्या आवडीचे गिफ्ट देण्याला प्राधान्य देण्यात येते. आपल्या प्रेमाचा गोडवा वाढावा यासाठी हे गिफ्ट देण्यात येते. सहसा टेडी बेअर देण्यात येते, कारण हे दिसायला अत्यंत सुंदर असते आणि मुलींना अधिक आवडते.
11 फेब्रुवारी या दिवसाला ‘प्रॉमिस डे’ साजरा करण्यात येतो. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देण्याचा हा दिवस आहे. या दिवशी प्रेमात आकंठ बुडालेली जोडपी एकमेकांना साथ देण्याचे वचन देऊन आपल्या प्रेमावर शिक्कामोर्तबच करतात.
12 फेब्रुवारी या दिवसाला ‘किस डे’ साजरा करण्यात येतो. एकमेकांजवळ आलेल्या दोन व्यक्ती प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर या क्षणाला कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात जपून ठेवण्यासाठी किस करतात अर्थात चुंबन घेतात. आयुष्यभर या आठवणी लक्षात राहतात. किस करण्याचे फायदेही अनेक आहेत.
13 फेब्रुवारी या दिवसाला ‘हग डे’ अर्थात आलिंगन दिवस साजरा करण्यात येतो. कोणत्याही गोष्टी शब्दाने व्यक्त होत नसतील तर मिठीत आणि स्पर्शाने सर्व काही व्यक्त होत असते. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात येतो. एकमेकांना मिठीत घेऊन एकमेकांची साथ देण्याचा अनुभव हा खासच असतो. जो जोडप्याला कठीण प्रसंगातही बांधून ठेवतो.
14 फेब्रुवारी या दिवसाला ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमाचा दिवस साजरा करण्यात येतो. हा पूर्ण दिवस एकमेकांच्या साथीने घालविण्याचा दिवस आहे. आयुष्यभराच्या आठवणी गोळा करण्याचा आणि आनंदात राहण्याचा दिवस आहे.
प्रेमासाठी अर्थात प्रत्येक दिवस आहे. हे कितीही खरं असलं तरीही व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची एक वेगळीच मजा आहे आणि ती प्रत्येकाने आयुष्यात अनुभवायला हवी. हा व्हॅलेंटाईनचा दिवस तुम्हीही आपल्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबर साजरा करा आणि दरवर्षी नव्या आठवणी जोडत जा! या संपूर्ण प्रेममय आठवड्याच्या आपणास अगणित हार्दिक शुभेच्छा..!
शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे कमळवेल्ली, यवतमाळ भ्रमणध्वनी-7057185479