⭕महापुरुषांची माहिती व्हावी व त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मंडळाचा हा उपक्रम
रत्नागिरी : जिल्ह्यात सगळीकडे शिवजयंती साजरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचपध्दतीने हातखंबा येथील बौद्धवाडीमध्ये हि बोधीसत्व बौद्ध विकास मंडळ व संबोधी महिला मंडळाकडून पुस्तके वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत बाळू कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर महिला मंडळाच्या अध्यक्षा मनिषा मोहन कांबळे यांनी दीप प्रज्वलन करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या खऱ्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुस्तक वाटप करण्याचे काम मंडळाच्यावतीने केले जात आहे. महापुरुषांची माहिती व्हावी व त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम बोधिसत्व बौद्ध विकास मंडळाकडून राबविला गेला आहे. यावेळी अनेक शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील पुस्तके देण्यात आली.
या कार्यक्रमात सुजल नितीन कांबळे याने शिवरायांवरील पोवाडा गायला तर सुहानी सचिन कांबळे हिने मनोगत व्यक्त केले. तसेच प्रियंका कांबळे, रसिका कांबळे, प्रांजली कांबळे या महिलांनी देखील मनोगत व्यक्त करून उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस कांबळे यांनी केले.
यावेळी राजेंद्र कांबळे, प्रदीप कांबळे, महेंद्र कांबळे, नितीन कांबळे, नंदिनी कांबळे, शालिनी कांबळे, सानिका कांबळे, सांची कांबळे, पूजा कांबळे, रोहित कांबळे, रोहन कांबळे, दीपेश कांबळे आदी उपस्थित होते.