⭕ राज्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर पोहचले असून आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भ्रष्टाचार प्रकरणावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप आता हत्येच्या आरोपापर्यंत आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर आले आहेत. आता हे आरोप-प्रत्यारोप फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप प्रत्यारोप राहिले नाहीत. तर, आता अनेक हत्यांचे आरोप होत आहेत. हत्यांच्या आरोपांबाबत एखाद्या पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही. त्यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे आणि सत्य परिस्थिती समोर आणावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. एंटेलिया स्फोटक प्रकरण आणि शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांनीच माफीचा साक्षीदार व्हावं, असेही प्रकाश आंबडेकर यांनी सांगितले.