सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसह रस्त्यावर उतरु- प्रकाश दत्तवाडे

सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसह रस्त्यावर उतरु- प्रकाश दत्तवाडे

जलअभियंता व उपुमख्याधिकारी यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती

इचलकरंजी/प्रतिनिधी –
मागील वर्षभरापासून शहरवासियांना भेडसावणार्‍या पिण्याच्या पाणी प्रश्‍नावरुन ताराराणी पक्षाच्यावतीने इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली जलअभियंता व उपुमख्याधिकारी यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली. यावेळी दररोज पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत पाणी प्रश्‍नावरुन तीव्र संताप व्यक्त केला. नजीकच्या काळात सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसह रस्त्यावर उतरु, असा इशारा प्रकाश दत्तवाडे यांनी यावेळी दिला.
शहरात मागील वर्षभरापासून पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण केली जात आहे. वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने केल्यानंतर प्रशासनाकडून केवळ आश्‍वासने मिळत असल्याने नागरिकांतून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर ताराराणी पक्षाच्यावतीने नगरपरिषदेत जावून प्रशासनाला जाब विचारण्यात आला. यावेळी अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, राजू बोंद्रे, संजय केंगार, दीपक सुर्वे आदींनी कट्टीमोळा डोहातून पाणी उपसा कधी सुरु होणार, कृष्णा योजनेच्या गळतीचे संकट कधी दूर होणार आणि शुध्द पेयजल प्रकल्प कधी सुरु होणार आणि शहरातील पाणीटंचाईचे संकट दूर होऊन एकदिवसआड पाणी कधी मिळणार अशी प्रश्‍नांची सरबत्ती जलअभियंता सुभाष देशपांडे व उपमुख्याधिकारी केतन गुजर यांच्यावर केली. आमदार प्रकाश आवाडे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 100 शुध्द पेयजल प्रकल्पांसाठी 4 कोटीचा निधीही आणून दिला असताना त्याचे काम का रखडले असा सवाल केला. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची अशी अवस्था असेल तर एैन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. त्यामुळे पेयजल प्रकल्पांचे काम गतीने पूर्ण करुन पाणी पुरवठा करावा. त्याचबरोबर कट्टीमोळा डोहातील तांत्रिक गोष्टींची पूर्तता लवकरात लवकर करुन तेथून पाणी उपसा करावा, अशी मागणी केली.
जलअभियंता सुभाष देशपांडे यांनी, कट्टीमोळा डोहातील पंप तांत्रिक कारणामुळे नादुरुस्त झाला असून तो दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. तसेच पंचगंगा जॅकवेलमधील पंपसुध्दा दुरुस्तीसाठी दिले आहेत. शिवाय आणखीन एक पंप खरेदी केला जाणार असून यापैकी एक पंप लवकरात लवकर उपलब्ध झाल्यास उन्हाळ्यात फारशी पाणीटंचाई जाणवार नाही. त्याचबरोबर 99 शुध्द पेयजल प्रकल्पापैकी 59 शेड उभारण्यात आले असून 42 ठिकाणची मशिनरी आहे. तर 32 ठिकाणी वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध असून येत्या आठ दिवसात 32 प्रकल्प सुरु करण्यात येतील. तर उर्वरीत प्रकल्प हे मार्चपूर्वी सुरु करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
शिष्टमंडळात शेखर शहा, एम. के. कांबळे, चंद्रकांत इंगवले, महावीर कुरुदंवाडे, नरसिंह पारीक, राहुल घाट, प्रशांत कांबळे, इम्रान मकानदार, सतिश मुळीक, नितेश पोवार, सुहास कांबळे, कपिल शेटके, अनिल शिकलगार, विजय पाटील, शांताराम लाखे, फरीद मुजावर, रंगा लाखे, इरफान आत्तार, विजय पोवळे आदींचा समावेश होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *