मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. आज सकाळी पाच वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी चौकशी केल्यानंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता.
काय आहे प्रकरण
9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोप केले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी नवाब मलिकांचे संबंध असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. या पत्रकार परिषेद फडणवीस म्हणाले होते की, ‘मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. ‘सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे.’
1993 च्या बॉम्बस्फोटात दाऊदचा हात होता. दाऊदची बहिण हसीना पारकर तिचा फ्रंट मॊन शाहवली खान आहे. या शाहवली खानकडून नवाब मलिकांनी ही जागा अवघ्या 30 लाखांत विकत घेतली. ही जागा सॉलिडस या कंपनीने विकत घेतली आहे. ही कंपनी मलिकांच्या कुटुंबीयांची आहे. आरोप करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘2005 मध्ये जो व्यवहार झाला त्यावेळी तिथला दर काय होता? तर त्याच्या मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर 415 रूपये स्क्वेअर फूटने जागा घेतली ती मलिक कुटुंबाने घेतली होती. याच रोडवर एक जागा 2005 मध्ये एक जागा 2 हजार रूपये स्क्वेअर फूटने विकत घेतली आहे. सॉलिडसने याच वर्षी दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून ही जमीन 25 रूपये स्क्वेअर फूटने घेतली आहे. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रूपये चौ. फुटाने घेतली असून 15 रूपये चौ. फुटाने पैसे दिले आहेत. आता प्रश्न हा आहे की मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन का विकत घेतली गेली?’