रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे जगात तिसऱ्या महायुद्धाचे वादळ घोंगावत आहेत. त्यातच भारताला आणखी सामर्थ्यवान बनवण्यासाठी भारताच्या लष्काराच्या ताफ्यात आणखी तीन राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. फ्रान्समधून ही विमाने भारतात आली असल्याची माहिती हवाई दलाने बुधवारी दिली.
हवाई दलाने केलेल्या ट्विटनुसार या तीन विमानांमुळे हवाई दलाच्या ताफ्यातील राफेल लढाऊ विमानांची संख्या आता 35 झाली आहे. भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने मिळवण्यासाठी करार केला होता. शेवटचे अर्थात 36 वे विमान काही आठवड्यांनंतर फ्रान्सहून भारतात पोहोचणार आहे. यापैकी 30 हून अधिक विमाने कोठेही न थांबता थेट भारतीय भूमीवर उतरवली आहेत. राफेलचा समावेश झाल्यानंतर हवाई दलाची लढाऊ क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. हे लढाऊ विमान सर्वात लांब पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे उल्का क्षेपणास्त्र, हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे हॅमर क्षेपणास्त्र आणि स्कॅल्प क्षेपणास्त्राने सज्ज आहे.
हे विमान का आहे खास
भारताच्या पूर्वेकडील क्षेत्रातील राफेलच्या सहभागामुळे या प्रदेशातील लष्करी शक्तीला चालना मिळणार आहे. हे लढाऊ विमान आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहेत. सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या राफेल लढाऊ विमानात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. राफेल लढाऊ विमानांमध्ये 74 किलोग्रॅम न्यूटनची दोन एम88-3 साफ्रान इंजिन देण्यात आली आहेत. ही लढाऊ विमाने उड्डाण करताना एकमेकांना मदत करू शकतात. एका विमानाला दुसर्या विमानात इंधन पुरवण्यास ही विमाने सक्षम आहेत. राफेल ताशी 2,222.6 किलोमीटर वेगाने आणि 50 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते.