कणकवली – सर्व अटी आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करूनच मालवणचा नीलरत्न बंगला बांधलेला आहे. त्यामुळे हा बंगला कुणीही तोडू शकत नाही, ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी या बंगल्यावर कारवाई करून दाखवावी असे जाहीर आव्हान नारायण राणे यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याच बरोबर सध्या सुरु असलेल्या सुडाच्या राजकारणाचा शेवट सुधा मीच करणार आहे असेही त्यांनी सांगितले.
आज कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील महिला भवनमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. मालवण नजीकच्या नीलरत्न बंगल्यातील अनधिकृत बांधकामाच्या बाबत त्यांना देण्यात आलेल्या नोटीसीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, तिथे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झालेले नाही. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून नियमानुसारच बांधकाम केलेले आहे. पण काही लोक सुडाचे राजकारण करीत आहेत. मात्र या सुडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार आहे. तसेच ज्याच्यात हिम्मत असेल त्यांनी माझा बंगला पडून दाखवावा, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले आहे.