पुणे : पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत अतिशय सकारात्मक विधान केले आहे. ते म्हणाले, २०२० मध्ये महामारीने प्रभावित होऊनही, आशियाई देशांचा जीडीपी संपूर्ण जगात सर्वाधिक राहिला असून, भारताने उर्वरित जगाच्या आर्थिक विकासाचा दर ओलांडला आहे. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेतील आपले योगदान २०३० पर्यंत ६० टक्क्यांपर्यंत पोहोचेल असेल.
दरम्यान, पुणे इंटरनॅशनल सेंटर पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेला आशिया इकॉनॉमिक डायलॉग २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यावेळी या शिखर परिषदेची थीम ‘पँडेमिक पोस्ट वर्ल्ड इन रेझिलिएंट ग्लोबल ग्रोथ’ अशी ठेवण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एमडी आणि अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. पीआयसीचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर यांच्याशी झालेल्या संभाषणात मुकेश अंबानी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग जगातील सर्वात वेगवान आहे. आपल्याकडे जगातील सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ आहे. या बाजारपेठेचया आधारे जगाच्या अर्थव्यवस्थेतील आपले योगदान २०३० पर्यंत ६० टक्क्यांपर्यंत पोहोचेल. पुढील दशकापूर्वी भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत आशिया आणि विशेषतः भारताचा वाटा वाढत आहे. यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेत आशिया हे आकर्षणाचे केंद्र असून त्याचा दबदबा वाढत आहे. यादरम्यान त्यांनी हरित ऊर्जेला चालना देण्याबाबत आणि या क्षेत्रातील भारताच्या आघाडीच्या भागीदारीबद्दल भाष्य केले.