रत्नागिरी : उक्षी – वांद्री परिसरातील बावनदीचे पात्र पूर्ण गाळाने भरून गेले आहे.या नदीच्या गाळ उपशाला १५ मार्च पूर्वी सुरवात न केल्यास एक दिवसीय आंदोलन करणार असे उक्षी ग्रामस्थ व गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी सांगितले.
उक्षी ग्रामस्थ व गाव विकास समितीचे पदाधिकारी यांनी बावनदी पात्रातील गाळ उपसण्यात यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. गेली ३ वर्षे इथले ग्रामस्थ बावनदीतील गाळ उपसला जावा यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे डोळेझाक करून पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका स्थानिक ग्रामस्थांना बसत आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. ८०-१०० एकर शेतजमीन पुरामुळे नापिक बनली आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका इथल्या ग्रामस्थांना बसला. तशी परिस्थती भविष्यात पुन्हा येऊ नये म्हणून १५ मार्चपुर्वी बावनदीतील गाळ उपसण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांसह मुझम्मील काझी यांनी केली आहे.
१५ मार्चपुर्वी जर गाळ उपशाला सुरवात न झाल्यास २१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शासनाच्या निषेधार्थ उक्षी ग्रामस्थ तसेच गाव विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करु असा इशारा मुझम्मील काझी यांनी दिला आहे.