संघटन प्रमुख सुहास खंडागळे,अध्यक्ष उदय गोताड यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन!
रत्नागिरी : कोकणातील गावागावात वाढती बेरोजगारी व रोजगारासाठी अन्य शहरात वाढते स्थलांतर याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समिती मार्फत देवरुख तहसील येथे 23 मार्च रोजी संघटन प्रमुख सुहास खंडागळे,अध्यक्ष उदय गोताड यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.मंगेश कांगणे यांनी दिली आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात गाव विकास समितीने म्हटले आहे की,कोकणातील तरुण वर्ग हुशार आहे,त्याच्याकडे टॅलेंट आहे.दरवर्षी 10 वी आणि 12 वी चा निकाल हा सर्व बोर्डात कोकण पहिल्या क्रमांकावर असतो.मात्र कोकणात शिकणारा हा विद्यार्थी भविष्यात येथे रोजगाराच्या संधी नसल्याने अन्य शहरात स्थलांतरित होतो याकडे गाव विकास समितीने लक्ष वेधले आहे.
कोकणातील ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबई,पुणे, कोल्हापूर ,सांगली यासारख्या शहरात स्थलांतरित होत आहे.
आपल्या तालुक्यात ही उद्योग व्यवसाय बाबत शासकीय स्तरावर उदासीनता आहे.तरुण वर्ग स्थलांतरित होत असल्याने गाव अक्षरशः ओस पडत आहेत. फक्त सणांच्या दिवसाला चाकरमानी कोकणामध्ये येतात. कोकणचे कोकणपण टिकवायचं असेल आणि गावांचे गावपण टिकवायचे असेल तर गावांच्या जवळपास किमान तालुक्याच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत. तालुकानिहाय एमआयडीसी विकसित करून त्याठिकाणी उद्योग धंदे निर्माण केले जावेत आणि यासाठी शासकीय स्तरावर धोरण निश्चित केले जावे अशी मागणी डॉ.कांगणे यांनी निवेदनात केली आहे.
या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी,गावांमध्ये वाढती बेरोजगारी, तरुणांचे रोजगारासाठीचे वाढते स्थलांतर या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही 23 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत तहसीलदार ऑफिस देवरूख येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करणार आहोत.संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे व उपाध्यक्ष राहुल यादव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे असे डॉ.कांगणे यांनी म्हटले आहे.
तालुक्यातील एमआयडीसी विकसित करून रोजगार निर्मिती करा,गावातील स्थलांतर थांबवा ही आमची प्रमुख मागणी आहे असेही कांगणे यांनी म्हटले आहे.