मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध आता शिथील केले जात आहेत. राज्य सरकारने १४ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानं तिथले निर्बंध हटवले आहेत. तर उर्वरित जिल्ह्यात काही निर्बंध कायम ठेवले आहेत. ए वर्गात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हटवण्यात आले आहेत.
ज्या जिल्ह्यात पहिला डोस ९० टक्के आणि दुसरा डोस ७० टक्के नागरिकांनी घेतला असेल त्या जिल्ह्याचा समावेश ए वर्गात आहे. तसंच पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून कमी आणि ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांहून कमी भरलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
निर्बंध हटवलेले जिल्हे कोणते ?
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर.
उर्वरित जिल्ह्यात काय आहेत निर्बंध?
ए वर्गातील जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध अद्याप कायम आहेत. यामध्ये अंत्यसंस्कार, लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धा यांसाठी ५० टक्के उपस्थितीसह परवानगी देण्यात आली आहे.
शॉपिंग मॉल्स, सिनेमागृहे, रेस्टॉरंट हे पूर्ण क्षमतेने उघडण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहेत. तसंच जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क या ठिकाणी ५० टक्के क्षमतेची मर्यादा कायम आहे.