युक्रेनच्या अखितिर्का, सुमी शहरांवर रशियाचे रॉकेट हल्ले
रशिया-युक्रेनमध्ये युध्दाची धुमश्चक्री आज 11 व्या दिवशीही सुरुच होती. रशियाने केलेल्या हल्ल्यांत युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख झाली आहेत. काल रात्री रशियाकडून युक्रेनमधील अखितिर्का, होस्टेमल, सुमी, मारियूपोल, ओडेसा या शहरांवर रॉकेट हल्ले करण्यात आले. रशियाचे सैन्य मेलिटोपोल शहराजवळ पोहोचले असून त्यांनी खारसन या लष्करी तळावर ताबा मिळवला आहे. रशियाने शास्तिया शहरावरही कब्जा मिळविला आहे. गेल्या 11 दिवसांत युक्रेनमधील 2203 अधिक सैन्य तळांना उध्वस्त केल्याचा दावा रशियाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, उद्या सोमवारी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांत युध्द शांततेसाठी चर्चेेची तिसरी फेरी पार पडणार आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत युध्दविराम होणार का? याकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियन सशस्त्र दलाने 11 दिवसांच्या युद्धात युक्रेनची 69 विमाने, 748 टँक आणि इतर बख्तरबंद लढाऊ वाहने, 76 रॉकेट लाँचर, 274 फील्ड आर्टिलरी आणि मोर्टार, 532 विशेष लष्करी वाहने उध्वस्त केली. त्याचबरोबर 59 मानवरहित हवाई वाहन उपकरणेही नष्ट केली आहेत. तसेच झिटोमिरमधील कोरोस्टेन मेट्रो स्टेशनजवळ रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. युक्रेननेही रशियाचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला आहे. युक्रेनने आतापर्यंत 11 हजार रशियन सैनिकांना ठार केले आहे, असे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. तसेच युक्रेनने मोठ्या संख्येने रशियन सैनिकांना ओलीस ठेवले आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी दावा केला की, त्यांच्या सैन्याने 5 मार्चपर्यंत रशियन सैन्याची 79 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर पाडले आहेत.