देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोेंधळ; अज्ञाताने चप्पल फेकली
राज्याचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये विकास कामांचे उद्घाटन केले. मात्र फडणवीसांकडून अर्धवट कामांचे लोकार्पण करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. त्यानंतर फडणवीस पुढील कार्यक्रमाला जात असताना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पूर्णांनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. मात्र या उद्यानातील बरेच काम अर्धवट राहिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकत्यार्र्ंनी त्याला विरोध करत उद्यानाच्या समोरच झेंडे, काळ्या भीती दाखवून फडणवीसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याचवेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही पुढे येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर आले. पोलिसांनी वारंवार विनंती करुनही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला.