रत्नागिरी: जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सलग दोन दिवस लांजा आणि रत्नागिरी तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या तर काही भागात मध्यम प्रमाणात पाऊस पडला. याचा फटका पुन्हा आंबा बागायतदारांना बसला आहे. रोगराई वाढण्याची शक्यता असून फवारणीचा खर्च वाढणार आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढता आहे. दोन दिवसांपासून तापमान 35 अंशांवर स्थिरावले आहे. अशातच हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल्याने उकाड्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. दोनच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारपिटी सह मुसळधार पाऊस झाला. मात्र रत्नागिरीत दिवसभर ढगाळ वातावरण होते.
गुरुवारी सायंकाळी लांजा तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, जयगड मिऱ्या, किल्ला या परिसरात जोरदार पाऊस पडला. गणपतीपुळे मध्ये सुमारे अर्धा तासाहून अधिक पाऊस झाला. पावसामुळे या परिसरात अक्षरशः पाणी साचून राहिले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात यंदा हापूसची तोड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. याच कालावधीत पडलेल्या पावसामुळे आंबा तोडणी दोन दिवस पुढे ढकलावी लागली आहे. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे आंब्यावर किड रोग पसरण्याची शक्यता आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळेमोठ्या प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी औषध फवारणीचा खर्च वाढला. अवकाळीची परंपरा अजूनही कायम आहे. यावर्षी मोहर उशिरा आल्यामुळे फळधारणा होण्यासाठी बराच कालावधी लागला. त्यात या पडलेल्या अवकाळी पावसामुळे बारीक कैरी वर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात तयार होणाऱ्या फळाचा दर्जा घसरण्याची भीती आहे.
याबाबत आंबा बागायतदार डॉक्टर विवेक भिडे म्हणाले की आज पडलेल्या अवकाळी पावसामुळं दर्जावर परिणाम होईल. त्याचा आपसूकच दरावर परिणाम होऊ शकतो.
Posted inरत्नागिरी
जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा धुमाकूळ
