⭕अर्थसंकल्पात ठोस तरतूद न केल्याने अंगणवाडी कर्मचारी आक्रमक
मुंबई : राज्य सरकारच्या बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचा-यांसाठी एकही ठोस तरतुद न केल्यामुळे मुंबईत १५ मार्चला संताप मोर्चा काढण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. यासाठी २३ फेब्रुवारीला देखील आंदोलन करण्यात आले होते. पण तरीही शासनाने निराशा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मानधनात वाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, दैनंदिन माहिती भरण्यासाठी मराठीमधील चांगले ॲप, लाभार्थ्यांना चांगला पूरक पोषण आहार, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ, किरकोळ खर्चासाठीच्या रकमेत वाढ, रिक्त जागांवर भरती, पदोन्नती आदी मागण्यांसाठी त्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये अनेकदा आंदोलने केली. २३ फेब्रुवारीला आझाद मैदानावर धरणे आंदोलन दरम्यान महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिव कुंदन यांनी शिष्टमंडळाला भेट देत अनेक आश्वासने दिली होती. त्याचबरोबर राज्य सरकारच्या बजेटमध्ये काही मागण्या पदरात पडतील अशी अपेक्षा होती. पण नवीन मोबाईल देण्याच्या घोषणेशिवाय बजेटमध्ये काहीच ठोस घोषणा न केल्यामुळे १५ मार्चला आझाद मैदानावर अंगणावाडी कर्मचारी संताप मोर्चा काढणार आहेत. त्याचबरोबर २८ आणि २९ मार्चला दिल्लीत देखील देशव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील यांनी आॅनलाईन बैठक घेत आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी तालुका स्तरावर देखील आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.