रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशीतील उद्योगशील, कणखर, दिलदार, दानशूर आणि थोर सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध खाण व्यावसायिक,१३ गाव समाज परिवर्तन समिती (जाकादेवी) या समितीचे माजी अध्यक्ष, चवे गावचे सुपुत्र, समाजभूषण दिवंगत प्रभाकरराव बाळ यादव यांचा प्रथम स्मृतिदिनानिमित्त शोकसभेचा कार्यक्रम गुरुवार दि. १७ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता चवे-बौद्धवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
दिवंगत प्रभाकरशेठ यादव यांच्या परिवर्तनवादी विचारांना व स्मृतीला वंदन करण्यासाठी सामाजिक धार्मिक व राजकीय स्तरावरील कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा चवे यांनी केले आहे. प्रभाकर यादव यांनी आयुष्यभर सामाजिक-धार्मिक कार्यात मोलाचे योगदान दिले. गरजूंना आर्थिक व सामाजिक आधार दिला. स्मारक, मंदिर असो वा शाळा विधायक चळवळीला आपले मानून सढळ हस्ते त्यांनी मदतीचा हात दिला. धार्मिक चळवळीला फार मोठी गतिमानता आणली होती. धडाडीचे व कर्तबगार व्यक्तिमत्त्व म्हणून ते पंचक्रोशीत ओळखले जात. चवे गावातील प्रतिष्ठित व मार्गदर्शक व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. चवे गावातील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य फारच उल्लेखनीय मानले जाते. गोरगरीबांच्या पाठीशी भक्कमपणे ते उभे असत.अन्यायाविरोधात अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असे. सामाजिक व धार्मिक चळवळीसाठी ते आपली स्वतःची वाहने मोफत पुरवत असत. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर त्यांची प्रखर निष्ठा होती.सर्व स्तरावरील व्यक्तींशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. जाकादेवी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात प्रभाकरराव यादव यांचा सिंहाचा वाटा असल्याचे समाजबांधव आवर्जून उल्लेख करताना दिसतात. भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक चळवळ उभारण्याकामी प्रभाकर यादव यांचे योगदान मोठे लाभले. त्यांच्या तेजोमय कार्याची आजच्या पिढीला प्रेरणा मिळाली यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.