रत्नागिरी : रत्नागिरीच्या वि. दा. सावरकर नाट्यगृहातील अनेक गैरसोयीनी सध्या रंगमंचावरील कलाकारांची अक्षरशः घुसमट सुरू आहे. नाट्यगृहामध्ये प्रचंड उष्मा जाणवत असल्याने वातानुकुलीत यंत्रणेविना पर्याय नाही. मात्र बसविलेली वातानुकुलीत यंत्रणा कालबाह्य आणि कमी क्षमतेची आहे. नाट्यगृहाची रचनाही वादातीत नाही, ध्वनीयंत्रणेचाही आनंदच आनंद आहे. अशा समस्यांनी ग्रासलेल्या नाट्यगृहामुळे नाट्यप्रेमींची घोर निराशा होत आहे. यामुळे कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सावरकर नाट्यगृह हे पालिकेच्या मालकीचे आहे. नाट्यगृहाच्या रंगमंचावर वायूवीजनाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे रंगमंचावरचे कलाकार अक्षरशः घाम गाळून अभिनय करावा लागत आहे. नाट्यगृहात होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वातानुकूलित यंत्रणा व ध्वनी यंत्रणा हि नवीन बसवावी. अशी मागणी नाट्य प्रेमींनी प्रसार माध्यमांच्याद्वारे केली आहे.
सावंतवाडीतील क्षितिज इव्हेंट्स या संस्थेचे मत्स्यगंधा हे नाटक सुरू होते. पहिले दोन प्रवेश सुरळीत पार पडले. तिसरा प्रवेश मात्र सुरू होण्यात अडचण आली. भीष्माची प्रमुख भूमिका निभावणारे कलावंत बाळ पुराणिक यांना रंगमंचावरच अस्वस्थ वाटू लागले. दुसऱ्या प्रवेशात अखेरच्या भागातच तो जाणवू लागला होता, ते विंगेत गेले, तेव्हा त्यांना तो प्रकर्षाने जाणवू लागला. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करावे लागले. ही आफत पूर्णपणे गैरसोयीनी आली नसली तरी त्रास वाढलाच आहे. सावरकर नाट्यगृह दुर्लक्षित आहे. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी झाला नसेल, तेवढा त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत खर्च झाला आहे. पण तरीही गैरसोयीमध्येच कलाकार काम करत आहेत. तर नाट्यप्रेमीं नाईलाजाने नाटक पाहत आहेत, अशी सध्या परिस्थिती आहे.