रत्नागिरी : कातळशिल्प पर्यटन महोत्सवाअंतर्गत येत्या रविवारी २७ मार्च रोजी होणाऱ्या रत्नागिरी सायक्लोथॉनच्या नोंदणीला रत्नागिरी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सायकलप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रत्नागिरीतील सायकलप्रेमींव्यतिरिक्त मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोवा इत्यादी ठिकाणाहून सायकलप्रेमी रत्नागिरीत येणार आहेत. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेल्या रत्नागिरी, आरे वारे, गणपतीपुळे, चाफे, देउड या सागरी महामार्गावरून समुद्राच्या बाजूने सायकलिंग करण्याची संधी यानिमित्ताने सायकलप्रेमींना मिळणारे.
सायक्लोथॉनचे ड्रोन शूटिंग देखील होणार आहे. रत्नागिरीचे लोकप्रिय जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील हेसुद्धा सहभागी होऊन या सायक्लोथॉनची शोभा वाढवणार आहेत.
जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी कातळशिल्प संवर्धनासाठी होणाऱ्या या सायक्लोथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, निसर्गयात्रीचे सुधीर रिसबूड आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी यांनी केले आहे.