नवी दिल्ली : आता वेगाने घडामोडी कोकणातील रिफायनरीबाबत होताना दिसत आहेत. राज्याबाहेर रिफायनरी प्रकल्प जाणार नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. तसेच ज्या ठिकाणी विरोध नाही त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प होईल, असे देखील शिवसेनेचे म्हणणे आहे. दरम्यान, आता विदर्भात हा रिफायनरी प्रकल्प हलवा, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. नितीन गडकरी यांनी यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांना देखील या संदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र लिहिले आहे.
आता नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी हे प्रकल्प विदर्भात हलवा, असे म्हटले आहे. तसेच या प्रकल्पासाठी लागणारी रस्ते, वाहतूक व इतर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकल्पाला कोकणात होणाऱ्या विरोधामुळे नितीन गडकरी यांच्या या पत्राला महत्व प्राप्त झाले आहे. कोकणातील हे रिफायनरी प्रकल्प त्यांच्या या पत्रानंतर विदर्भात हलवण्यात येणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गडकरी यांच्या या पत्राला काय उत्तर देतील, हे पाहावे लागेल.