‘ काळ ‘ चा २२५ वा वर्धापनदिन

‘ काळ ‘ चा २२५ वा वर्धापनदिन

धार्मिक ,ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व वाङ्मयीन विषयांची नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे चिकित्सा करण्यासाठी ‘ काळ ‘हे राष्ट्रवादी विचारप्रणालीचे साप्ताहिक आपण सुरू केले.’ लोकात दृढमूल व रुढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदानासाठी काळचा जन्म झाला आहे ‘हे उद्दिष्ट जाहीर करून २५ मार्च १८९८ रोजी शिवराम महादेव परांजपे यांनी ‘काळ.हे वर्तमानपत्र सुरू केले. त्याचा २२५ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)

‘ काळ ‘ चा २२५ वा वर्धापनदिन

‘ लोकात दृढमूल व रुढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदानासाठी काळचा जन्म झाला आहे ‘हे उद्दिष्ट जाहीर करून २५ मार्च १८९८ रोजी शिवराम महादेव परांजपे यांनी ‘काळ.हे वर्तमानपत्र सुरू केले. त्याचा २२५ वा वर्धापनदिन आहे. त्या काळामध्ये लंडन आणि मुंबई येथून ‘ टाईम्स ‘ नावाचे इंग्रजी वर्तमानपत्र निघत असे. अर्थातच हे वर्तमानपत्र ब्रिटिश राजवटीची भलामण करतअसे.त्याला प्रत्युत्तर म्हणून एत्तदेशीयांच्या भावना काय आहेत हे स्पष्ट करण्यासाठी शिवरामपंत परांजपे यांनी’ काळ’ साप्ताहिक काढले.ते दर शुक्रवारी प्रकाशित होत असे. या साप्ताहिकातून जवळजवळ एक हजार लेख लिहिले. त्यातील काही लेख ‘काळातील निवडत निबंध ‘ या नावाने स्वतंत्रपणे दहा खंडात प्रकाशित करण्यात आले होते. पण भेटी सरकारने त्यावर जप्ती आणली होती. १९०८ साली शिवरामपंत यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला व ते तुरुंगात गेले.त्यांना एकोणीस महिन्यांचा सश्रम करावास झाला.तोपर्यंतची दहा वर्षे त्यांनी’ काळ ‘ निष्ठेने चालविला. धार्मिक ,ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व वाङ्मयीन विषयांची नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे चिकित्सा करण्यासाठी ‘ काळ ‘हे राष्ट्रवादी विचारप्रणालीचे साप्ताहिक आपण सुरू केले होते असे ते म्हणत.

‘काळ ‘मध्ये शिवरामपंतांनी विविध विषय हाताळले. गरिबांची उपासमार, संपत्तीचा दुरुपयोग,आम्ही, राज्य कशाने मोडकळीस येते ?, मराठी भाषेची लेखन पद्धती, तलवारीचा हक्क ,चित्रे ,आहाहा, मला दारू पिता आली असती तर किती बरे झाले असते ?, एका पूजेच्या गणपतीचे चित्र, इंग्रजांचे सामर्थ्य ,खोटे बोलण्याच्या विषयातील परीक्षा आणि बक्षीस, रुमाल्या भिल्ल, काउंट टॉलस्टॉय यांची हिंदुस्थानातील समाजसुधारकांना सूचना ,स्थानिक स्वराज्य ,दक्षिण अमेरिका, सगळ्यावर उपाय आहेत पण, ग्रीस देश स्वतंत्र कसा झाला ?,एका शेतकऱ्याचा उद्गार,दासबोध ,विषासाठी कंठशोष,चळवळ, काँग्रेस आणि तिचे पुढारी असे असंख्य विषय लेखनासाठी निवडले.या सर्व लेखांमधून भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडवले पाहिजे, भारत स्वतंत्र झाला पाहिजे ,आपल्याला पराक्रमाचा इतिहास आहे, जगातील अन्य देशांनी जसे लढून स्वातंत्र्य मिळवले तसे आपण स्वातंत्र्य मिळवले पाहिजे असा संदेश ते देत होते. त्यांची लेखणी धारदार होती. वाचकांच्या काळजाला हात घालत उपहास व संताप त्यातून व्यक्त होत असे. शिवरामपंत निबंधकार ,वृत्तपत्रकार ,काळकर्ते म्हणून प्रसिद्ध होते तसेच फर्डे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.

त्यांचा जन्म २७ जून १८६४ रोजी महाड येथे झाला.२७ सप्टेंबर १९२९ रोजी ते पुणे येथे दम्याच्या विकाराने कालवश झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे झाले.१८६४ साली पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ते मॅट्रिक झाले. या परीक्षेत संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवणारे ते पहिले विद्यार्थी होते. एम.ए.झाल्यावर ते महाराष्ट्र कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक झाले. दोन वर्षांत ते काम सोडून दिले. याच दरम्यान ते लोकमान्य टिळकांच्या प्रभावाखाली आले.आणि जणजागरणाचे काम करू लागले.
शिवरामपंतांनी कथा, कादंबरी, नाटक,ललितलेख ,समीक्षा आदी साहित्य प्रकार हाताळले.१८२८ साली बेळगाव येथे झालेल्या चौदाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.त्यावेळी केलेल्या पस्तीस – चाळीस पानी अध्यक्षीय भाषणातुनही त्यांनी साहित्यविषयक अनेक मुद्यांची सविस्तर चर्चा केली आहे. एका खडी फोडणाराची गोष्ट, आम्रवृक्ष, एक कारखाना, एका यात्रेकरूचा प्रवास ,प्रभाकरपंतांचे विचार आदी कथा आणि गोविंदाची गोष्ट, विंध्याचल या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. संगीत कादंबरी, मानाजीराव, रामदेवराव ,पहिला पांडव इत्यादी नाटके त्यानी लिहिली. शेक्सपियर ,ऑडिसन आदी नाटककारांच्या नाटकांवर आधारित अशी नाटके त्यांनी लिहिली. तसेच किर्लोस्करांच्या ‘ सौभद्र ‘ नाटकाचे संस्कृत भाषांतरही त्यांनी केले.अहिल्याजारकाव्य हे दीर्घकाव्य लिहिले.त्याच बरोबर तर्कसंग्रह दीपिका, तर्कभाषा, पूर्वमिमांसेवरील अर्थ संग्रह आदी ग्रंथ लिहिले. मराठयांच्या लढायांचा इतिहास त्यांनी लिहीला.रुसोच्या ग्रंथांचे भाषांतरही त्यांनी केले होते. शिवरामपंत परांजपे विविध ज्ञानशाखांशी परिचित होते.

विद्यार्थीदशेतच त्यांनी आपले जीवन आदर्शपणे व्यतीत करण्याचे निश्चित केले. कॉलेजात शिकताना त्यांनी प्रचंड वाचन केले होते.जगातील स्वातंत्र्यलढायांचा अभ्यास केला होता. स्वातंत्र्य केवळ अर्ज विनंत्या करून मिळणार नाही ते संघर्षाने मिळवावे लागते असे त्यांचे मत होते.म्हणूनच ते टिळकांचे अनुयायी बनले.महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय भागीदारी केली. याच दरम्यान त्यांनी ‘स्वराज्य ‘ नावाचे साप्ताहिक काढले. ते सात वर्षे चालवून शंकरराव देव यांच्याकडे त्याची धुरा सोपवली.१९२२ मध्ये मुळशी सत्याग्रहात सहभाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास झाला. शिवरामपंत परांजपे हे टीकात्मक पत्रकारितेतील एक मानदंड होते.आजच्या भ्याड व सत्ताधार्जिण्या माध्यमकाळात ‘काळ ‘ चे महत्त्व नव्याने अधोरेखित होते. आज ‘काळ ‘ या त्यांच्या साप्ताहिकाच्या २२५ वा वर्धापन दिनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली तेहतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाचे संपादक आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *