शरद पवार साहेबांवर वार करणारे कोण?
(आंदोलनाचा ग्राऊंड रिपोर्ट उदय नरे यांसकडून)
पुरोगामी महाराष्ट्रात राज्यातीलच नव्हे तर, देशातील राष्ट्रीय पातळीवरील नेते शरद पवार साहेबांच्या मुंबईतील ” सिल्वर ओक “यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचारी आंदोलकांनी दगड भिरकावले, चप्पल फेक केली व अर्वाच्य भाषेत लाखोली वाहिली.
“शरद पवारांच्या घरावर हल्ला “अशी ब्रेकिंग बातमी अनेक चित्र वाहिन्यांवर झळकू लागली. वाहिन्याचे दांडे (बूम) ज्या ठिकाणी पोहचतात त्या ठिकाणी मात्र महाराष्ट्राचे पोलीस पोहोचू शकत नाही? ही फार मोठी शोकांतिका आहे. शरद पवार ज्या पक्षाचे नेते आहेत त्याच पक्षाचे गृहमंत्री राज्यामध्ये आहेत, हे सरकारी यंत्रणेचे अपयश आहे का असा मोठा प्रश्न आता पडलेला आहे? महाराष्ट्र राज्यात नेत्याच्या घरावर होणारा हल्ला ही पहिलीच वेळ नाही. आता सत्ताधारी म्हणत असतील की राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घरांवर होणारे हल्ले हे दुर्देवी आहेत परंतु अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही राज्यामध्ये झालेले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावर हल्ला झालेला सर्वांना आठवत असेल, नारायण राणे यांच्या घरावर हल्ला झाला देवेंद्र फडणीस माजी मुख्यमंत्री यांनाही अशा रोषाला सामोरे जावे लागलेले आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी म्हणजे महाराष्ट्राची जनता आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी केलेली ही कृती ही निंदनीय आहे. अशा प्रकारे केलेल्या हल्ल्याचे कोणी समर्थन करू शकत नाही परंतु आज पहिल्यांदाच राज्यामध्ये झाला अशी आवई उठवणे चुकीचे आहे. ज्या ठिकाणी प्रसार माध्यमाचे तांडे जातात छायाचित्रण केलं जाते, मुलाखती घेतल्या जातात अशा ठिकाणी देशातील एका राष्ट्रीय नेत्याच्या घरावरती हल्ला होत असताना पोलिसांना त्याची खबर नसणे हे अत्यंत दुर्देवी आहे.
ज्येष्ठ वकील सदानंद वर्दे या कामगारांचे नेतृत्व करत आहेत त्यांची अटक होण्यापूर्वी त्यांना अटक होणार? अशा बातम्या प्रसारमाध्यमातून येत होत्या, आणि म्हणूनच काय त्यांच्या अटके पूर्वी अनेक प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. फोनो झाले. लाईव्ह प्रसारण झाले झाले. या हे आंदोलन एकाएकी झाले नाही या आंदोलनाच्या मागे कोणत्या तरी एका अज्ञात शक्तीचा हात असावा हे सांगायला लहान मुल सुध्दा नकोय!
नुकत्याच दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन राज्यामध्ये झाले होते परीक्षा जाहीर झाल्यानंतर धारावी व इतर ठिकाणी राज्यात आंदोलन कर्त्यांनी राज्यात धुमाकूळ घातला होता. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी ही कठीण व नाजूक परिस्थिती कौशल्याने हाताळली. शिक्षण खाते काँग्रेस कडे असल्याने हे आंदोलन झाले का? व परीक्षा कोविड काळात घेणे किती धोकादायक आहे अशी वातावरण निर्मिती जाणीवपूर्वक केली होती. परंतु राज्यातील परीक्षा कधी नव्हे त्या पेक्षा अधिक सुरळीतपणे व सुलभ पार पडल्या. अर्थात याचे सारे श्रेय शिक्षण मंत्र्यांप्रमाणेच शाळेतील शिक्षक, शिक्षण अधिकारी व विद्यार्थ्यांकडे जाते. आंदोलनात भाग घेणारे मुळात विद्यार्थी नव्हतेच. आंदोलक हे एका अज्ञात शक्तीद्वारे निर्माण केले गेले होते. तसेच एसटी कामगार आंदोलक आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.
आज-काल राजकारणातील चित्र पाहता त्यात तिसऱ्या आघाडीची सरकार कधी पडेल व कसे पडेल यासाठी विरोधी पक्ष देव पाण्यात ठेवून बसले आहेत. हे सरकार बनवण्यासाठी अग्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरावर इडीने टाच आणली असतात शरद पवार साहेब हे तात्काळ दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधतात, परंतु आपल्याच पक्षातील दोन नेते गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांकांचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यावर शरद पवारांनी एवढे तत्परता का दाखवली नाही? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे. एसटी कामगारांचा संप चिघळत असताना मात्र सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली. आज एसटी कामगार कर्मचारी अन्न, पाण्यावाचून आंदोलन करत आहेत. परिस्थिती बिकट आहे. अशावेळी त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना सहानुभूतीची गरज आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य होत असल्या तरी एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे ही मागणी मात्र कदापि शक्य होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. परंतु या कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी हवा भरवणारे कोण आहेत? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. एसटी कामगारांच्या संपामुळे मात्र आज आठवण होते ती 1982 साली निर्माण झालेल्या गिरणी कामगार संपाची. आठवण झाली का? तर मी एक गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे. डॉंक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा संप सुरू झाला. आज पर्यंत हा संप चालू आहे. संपात संपलेला आणि त्यानंतर बेघर झालेल्या महाराष्ट्रातील गिरणी कामगार म्हणजेच मराठी माणूस या मराठी माणसांसाठीच म्हणजे कामगारांसाठी त्यावेळेस कोणी उभा नव्हता व आजही कोणीही मराठी नेता धावून येत नाही. हा प्रश्न आता मोठा उभा राहिलेला आहे?
एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आणि हल्ला केला ते शरद पवार यांच्या निवासस्थानी परंतु एसटी कामगारांचा प्रश्न आहे तो परिवहन मंत्री म्हणजे शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याकडे. असे असताना शरद पवारांच्या घरावरती हल्ला करण्याचे कारण काय? हा हल्ला पूर्वनियोजित होता यात तिळमात्र शंका नाही. काही क्षणातच खासदार सुप्रिया सुळे त्या ठिकाणी गेल्या. एसटी कामगारांच्या कर्मचाऱ्यांसमोर हात जोडून त्यांच्या मागण्या संदर्भात आपण बोलू अशी विनंती करत असल्याची चित्रफित सर्व माध्यमावर प्रसारित झालेली आहे. परंतु आंदोलन कर्ते कोणाचे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. सर्व आंदोलक आझाद मैदानावरून चालत सिल्वर ओक या पवार साहेबांच्या निवासस्थानी गेले होते. आझाद मैदानावरून त्यांना हुसकावून लावण्यात आले होते. आता तर त्यांना पोलिसांनीच मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस वरती जाण्यास सांगितले छत्रपती शिवाजी टर्मिनस वरती नेहमीच गर्दी असते आणि त्यातच या आंदोलनकर्त्यांची गर्दी. शरद पवार आणि अनिल परब यांची निवासस्थान आणि सिएसटीएम रेल्वे स्टेशन यांनाही पोलीस छावणीचे स्वरूप आलेले आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची चित्र निर्माण होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी सुद्धा नेहमीप्रमाणेच अल्पसंख्यांकांवर आपल्या भाषणातून आसूड ओढले. मशिदीवरील भोंगे हटवण्याची सूचना केली तसे न झाल्यास हनुमान चालीसा सुरू करण्याचा इशारा दिला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असताना गृहमंत्र्यांना दिलीप वळसे-पाटील यांची नेहमीच मवाळ राहिली असा आरोप इतर कोणी न करता शिवसेनेचे नेतेच करत आहेत. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या विरुद्ध भरभक्कम पुरावे देऊन सुद्धा गृह खात्याने कोणतीच कारवाई केली नाही असा आरोप करण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याकडे शिवसेनेचे लक्ष आहे. मुख्यमंत्र्याकडे बहुतांश गृहखाते असते या मागणीसाठी वर्षावर बैठक झाली असे प्रसारमाध्यमातून समजले. राज्य सरकारचे दुर्दैव असे की सरकार स्थापन होताच सहा महिन्यात कोरोनाचे आक्रमण दोन वर्ष राज्यावर होते. तीन पक्षाची मोट बांधताना मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपल्याच नेत्यांवर ती ईडीची कुऱ्हाड कोसळत आहे. पक्षांतर्गत हेवेदावे चालूच आहेत सर्व प्रकारामुळे वातावरणातील उष्णते प्रमाणेच राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. आणि यात तापलेल्या वातावरणात शरद पवार यांच्या घरावर झाली दगडफेक व चप्पल फेक हा पूर्वनियोजित कट आहे आणि तो कोणी केला? त्याच्या पाठीमागे कोण आहे? हे शोधण्याचे काम आता त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे आहे.
राज्यातील दुसरे महत्त्वाचे आंदोलन कर्ते म्हणजे शाळेतील विना अनुदानित शिक्षक. गेली अनेक वर्षे हे आंदोलन कर्ते मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेले आहेत. दरवर्षी आधिवेशनातील काळात शिक्षक आंदोलक हे आंदोलन करत आहेत. शिक्षक आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार ना. गो. गणार. हे शिक्षकांचे प्रश्न सभागृहात मांडत आहे. शालेय शिक्षण मंत्री अभ्यासपुर्ण शिक्षकांच्या प्रश्नांवर उत्तर देत आहेत. शालेय शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न हे अर्थ खात्याशी संबंधित आहेत. आंदोलनकर्ते अनिल बोरनारे, शिवनाथ दराडे, जालिंदर सरोदे, सुभाष मोरे यासारखे अनेक शिक्षकांचे प्रतिनिधी शिक्षण विभागाचे व शिक्षकांचे प्रश्न व समस्या घेऊन मंत्रालयात मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री महोदयांकडे जात असतात. अनेकदा प्रश्न निकालात निघतात तर काधी प्रलंबित राहतात. इतर आंदोलन कर्ते हे आक्रमक आहेत पण मुळात शिक्षक असलेल्या व विद्याविभूषित असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. आपली पोळी भाजण्यासाठी भविष्यात या आंदोलनकर्त्यांचा वापर केला नाही म्हणजे झाले. कारण आंदोलन करणार्यांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी नेता पाहिजे असतो. गरजवंताला अक्कल नसते. हातात दगड व पायात चप्पल हे हत्यार झाले आहे.
या आंदोलनाचे खरे सूत्रधार कोण आहेत?हे शोधावेच लागेल. जर अशा प्रकारे आंदोलन सुरू झाली तर पुढचे आंदोलनही तयार आहे. नाहीतर म्हणावे लागेल गुमनाम है कोई बदनाम है कोई.