आमदार प्रकाश आवाडे यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर निवड
इचलकरंजी/प्रतिनिधी –
हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा आमदार प्रकाश आवाडे यांची मांजरी बु॥ (जि. पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या नामवंत संस्थेच्या “गव्हर्निंग कौन्सिल“च्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था देशाचे माजी कृषिमंत्री पद्मभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली नवनवीन जातीचे ऊस बियाणे, साखर उत्पादनासाठी अत्याधुनिक मशिनरीचा वापर, इथेनॉल, सहवीज निर्मितीसारखी उपपदार्थ निर्मिती, शेतकर्यांना ऊस उत्पादनाबाबत बहुमुल्य मार्गदर्शन करीत आहे. कृषिविषयक क्षेत्रातील महत्वपूर्ण काम करणारी दक्षिण भारतातील अग्रगण्य संस्था म्हणून राष्ट्रीय पातळीवर संस्थेचा नावलौकिक आहे. या संस्थेच्या सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक कालावधीसाठी गव्हर्निंग कौन्सिल निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. सर्व जागा बिनविरोध झाल्याने आमदार प्रकाश आवाडे यांना या संस्थेवर काम करण्याची संधी खासदार पवार यांनी दिली.
आमदार प्रकाश आवाडे यांची शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेणे, साखर कारखान्यासाठी आर्थिक व प्रशासकीय शिस्त यामुळे कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखालील जवाहर साखर कारखान्याने मागील 29 वर्षात सातत्याने आधुनिकीकरणाची कास धरत प्रतिदिन 2500 मे. टनावरून 16000 मे. टनापर्यंत गाळप क्षमता वाढवून नुकत्याच संपलेल्या हंगामात 19 लाख 7 हजार टन इतके उच्चांकी ऊस गाळप केले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर त्यांना काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तेथील अनुभवाचा जवाहर कारखान्यास आणि सभासदांना तसेच परिसरातील शेतकर्यांना निश्चितच लाभ होईल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरील निवडीमुळे शेतकरी, सभासद आणि हितचिंतकाच्याकडून आनंद व्यक्त करून आमदार प्रकाश आवाडे यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Posted inकोल्हापूर
आमदार प्रकाश आवाडे यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर निवड
