• अनिल परब शिवसेनेच्या लोकांना डावलतात
• उदय सामंतांनी पक्षाचाच उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला
रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी
राज्यात तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं असलं तरी, स्थानिक ठिकाणच्या राजकारणामध्ये या तीन्ही पक्षांअंतर्गत असलेली धुसफूस या ना त्या कारणाने सतत दिसत असते. शिवाय रत्नागिरी, रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी हा वाद सर्वश्रुत आहे. याचाच प्रत्यय शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने रत्नागिरी येथे पुन्हा एकदा समोर आला आहे.
शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिवसैनिकांकडून टार्गेट झाले. या बैठकीत पालकमंत्री बदला आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २६ ते २९ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान राबिण्यात येणार आहे. शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्यासंदर्भात चिपळूणमधील पुष्कर हॉलमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल मोरे आणि शरद बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. सदर बैठकीत उत्तर रत्नागिरीमधील पाच तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात चिपळूण तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आक्रमक कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंतांच्या विधानाची आठवण करून देत त्यांच्यावर ही आरोप केले.
जवळपास चार तास पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या बद्दल नाराजीचाच सूर होता. नाराज कार्यकर्ते म्हणाले, पालकमंत्री फक्त झेंडा वंदन आणि दापोलीत राजकारण करण्यासाठी येतात. इतर वेळी ते जिल्ह्यात दिसत नाहीत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी तसेच गटप्रमुख, शाखा प्रमुख , विभागप्रमुख यांनी काय काम केले याविषयी पक्षाकडून नेहमी अहवाल मागवला जातो. मात्र मागील अडीच वर्षात पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्ह्यात काय काम केले? याचा खुलासा करावा. परंतु या सर्वातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत, असा आरोप देखील या बैठकीत करण्यात आला. चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. दापोली नगरंपंचायत निडणकीत पालकमंत्री आले आणि दोन गटात वाद निर्माण करून निघून गेले. त्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत सुद्धा नाहीत. संघटनेकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे परब यांच्यासारखे पालकमंत्री जिल्ह्याला नको, अशी मागणी ही उत्तर रत्नागिरीतील शिवसैनिकांनी केली. चिपळूण तालुक्यातून ही मागणी केल्यानंतर उर्वरित चार तालुक्यातून ही पालकमंत्री बदलण्याची मागणीला जोर धरला होता.
त्यानंतर शिवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर मंत्री उदय सामंत यांच्यावर उलटला. काही दिवसांपूर्वी राज्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रत्नागिरी जिल्ह्यात आले होते. त्यावेळी सावर्डे येथे एका कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मंत्री उदय सामंत म्हणाले होते की, चिपळूण मधील राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना २०१९ च्या विधानसभेच्या निडणुकीत आपण कशा पद्धतीने मदत केली या ठिकाणी सांगणार नाही. या विधानावरूनच मंत्री उदय सामंत यांना कार्यकर्त्यानी लक्ष केले. यावर आक्रमक झालेले कार्यकर्ते म्हणाले, सामंत यांनी केलेल्या विधानाचा स्पष्ट अर्थ त्यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केल्याचे स्वतः उघड केले. तसेच मंत्री सामंत यांनी शिवसेनेत राहून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले, असा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यानीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील बैठकीत करण्यात आली.
दरम्यान, यावेळी उत्तर रत्नागिरीतील चिपळूण ,गुहागर,खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच संतापले होते, मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी स्तब्ध झाले होते. कार्यकर्त्यांच्या मागण्या आम्ही पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवतो,अशी ग्वाही वरिष्ठ पदाधिकारी सुनिल मोरे आणि शरद बोरकर यांनी दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.