आजच्या राजकिय पक्षाची जडणघडण ! राज्याच्या तिजोरीचे हरण!जनतेच मरण !
आजच्या राजकिय पक्षाची जडण घडण पाहीली तर पक्षश्रेष्ठी जसा अवती भवती जमा करतात गोतावळा ! तसा मिळतो त्यांना शब्दाच्या भडीमाराचा वानवळा!
पक्षात आता नाही विचारवंत नाही संयमी नाही मवाळ सारेच खड्याळ,तोंड्याळ ! नाही शेंडा बुडुक नाही मुद्दा मुळ!श्रेष्ठीची चापलुशी हेच डोक्यात खुळ ! श्रेष्ठी हि ऐकुन होती मश्गुल ! परि चारित्र्याची होते बत्ती गुल
मग भोगावे लागतात शब्दाचे ओरखडे ते खडे बोल मुद्याची लढाई येते गुद्यावर! जनतेचे प्रश्न मारले जातात फाट्यावर! अन श्रेष्ठींची अब्रु निघते चव्हाट्यावर!
पुर्वी जन म्हणती ऐसा पुत्र जन्माला गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा,आता म्हणती ऐसा पुत्र जन्मावा ऐसा गुंडा त्याच्या हाती पक्षाचा झेंडा!कधी झेंडा गुंडाळून हाती केवळ दांडा ! नेत्यांच्या बरोबर दांड्यावर बदलतो झेंडा ! झेंडयाच्या नावावर घालता येतो ग॔डा ! जमवितो करतो करोडो मालमता अन सोन्यान भरतो हंडा! सामान्य माणसाच्या नशिबी मात्र असतो निजायला धोंडा ! अन खायला कोंडा!
मिळाली आझादी!परंतु लबाडानी बळकावली सत्तेची गादी! लुटुन खाणे अन खाऊन पचवणे हेच राजकारण झाले छंदीफंदी! पिढीजात चाले राजकारण मुळ खोडाला फुटते फांदीन फांदी!
गोरगरिबांचे तरूण लागतात यांच्या नादी! यांचाच करून वापर जातीय संघर्षांची गातात नांदी !
भरडले जातात निष्पाप संघर्ष पेटतो समाजामधी! मरणारे मरतात राजकारणी मात्र जगतात संभाळण्या सत्तेची गादी!
राजकारणात नाही नियोजन,नाही समाजकल्याण,योजनेतले हिस्सेराशीत लुटले जाते धन,
विकासाला नाही गती, नाही. प्रगती,शेतकऱ्यांची कर्जबाजारीत ओसाड पडु लागली शेती,पर्याय शेवटी आत्महत्या अन जिवनाची सदगती,अशी चालु आहे राजकारणात भ्रष्टनिती,महागाईचा आलेख चढु लागला वरती, सामान्याची मात्र जगण्याची होते फजिती! कष्ट करती दिनराती, तरी होईना पोटाची भरती
राजकारण्याच्या चारित्र्याला आता राहीली नाही लांबी रूंदी खोली,कोणाच्या आहेत रखेली, संरक्षणच्या गराड्यात राहुन राजकारण्याची असते बोली,
आतुन तमाशा वरून किर्तन अशी हि देहबोली,आमच्या नादी लागायला कोणाची.माय व्याली,
रोजच राज्याची तिजोरी होऊ लागली खाली! रोजच विविध कर दंड भरून जनतेचे खिसे होऊ लागले खाली!उदंड होऊ लागली नेत्याची चिल्लीपिली!
जनता जनार्दनानो आता नका राहु आंधळे,विचाराने लुळेपांगळे,
झणझणीत अंजन घालुन उघडा नेत्याचे डोळे ! नका निघु देऊ राज्याचे दिवाळे,बंद करा आता हे राजकिय सोहळे,दुर्लक्ष करा आता राजकिय नेते वेडेगबाळे !सक्षम,विचारवंतानो या आता पुढे राज्याला द्या गती प्रगतीचे वळण वेगळे,पुरे झाले झाले हे वंशा वळीचे खळेदळे,कुत्रे पीठ खाई अन दळे आंधळे,
आता होऊन सज्ञानी उघडुन ज्ञानी डोळे सज्ज होऊ साजरे करण्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी सोहळे ! तरूणानानो काढा डोक्यातुन राजकारणाचे भुत होऊन मायभुभिचे क्रांतीकारी सुत
देश रक्षणा खांद्यावर घ्या समतेचा ममतेचा राज्याच्या अस्मितेचा झेंडा,एकतेचा बलदंड असु द्या दांडा त्यावर नानाजाती नाना धर्माच्या रंगाचा एकसंघ झेंडा
माय बाप तुमचे म्हणतील पुत्र जन्मला ऐसा गुंडा खाद्यावर त्याच्या देश रक्षणाच्या समतेचा झेंडा ! कश्मिर ते कन्याकुमारी सह एकसंघ राहो.देश हाच असुद्या अजेंडा !
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक/ सामाजिक कार्यकर्ता