कुरूप – उध्वस्त जाणिवांचा बेधडक नाट्य अविष्कार
दिशा पिंकी शेख यांच्या काव्याचे नाटकरूपाने अस्वस्थ सादरीकरण.
भारतीय अध्यात्मामध्ये स्त्री-पुरुष ही भेदनीति कायम राहावी म्हणून तो आणि ती यांच्यामधील तो ती अर्थातच किन्नर हा वर्ग पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या दमन व्यवहार परिणामाचा घटक आहे. किन्नर वर्ग शापित व वरदान या दोन संस्कृतीच्या विपरीत परिणामामध्ये विभागला गेला आहे.शाप की वरदान हे धर्मव्यवस्थेने त्यांच्या जीवनाला दिलेले संस्कृतीचे दान व कुदान आहे.प्रकृती आणि पुरुष यांचा मानवी संस्कृतीने विचार केला आहे. निसर्गाच्या एकूण परिणामांतून प्रकृती आणि पुरुष यांची ऋतू नाती तयार झाली आहेत. त्यांना पुरुष आणि स्त्री या दोन गटात विभाजित करून अखिल मानवजातीने क्रांतीच्या सर्व टप्प्यांमध्ये शोषण करणारा पुरुष व शोषणाला सतत बळी पडणारी उपभोगयोग्य स्त्री ही भेदनीति ची केलेली निर्मिती आहे.
निसर्ग उत्क्रांतीक्षम आहे,निसर्ग हा जैविक अपघात आहे, निसर्ग हा हेतूविरहित वर्तन करणारा निरंतर ऋतुचक्राचा अतर्क्य घटक आहे.निसर्गाने दिलेल्या प्राप्त शरीराच्या पूर्ण व अपूर्ण घटकांमुळे निर्माण होणारी अखिल मानव जातीची समस्या किन्नर व्यवस्था होय.हे अध्यात्मिक विश्लेषण आधुनिकोत्तर काळामध्ये पुरेसे ठरत नाही. लिंगभाव हा मानवी सभ्यतेच्या सर्व निकषाजवळ थांबतो.इथे शारीरिक उपभोग, वासना,तुच्छता, उपेक्षा,बहिष्कृतता हेच ज्यांच्या जीवनाचे प्रमुख घटक बनतात. तृतीयपंथीयांच्या जीवनाला दयाभाव,सहानुभूती व उदार मानवी सभ्यतेचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत. याबद्दलच्या चळवळी स्त्री मुक्ती
चळवळीचा एक भाग म्हणून आता जगभर वाढू लागल्या आहेत.
तृतीयपंथीयांच्या जीवनाचे अधिकार हे मानवी हक्काच्या लढाई बरोबरच पुढे निघाले आहेत.माणूसपणाची मान्यता जीवनाच्या मूलभूत सर्व अधिकारांची प्राप्ती ही त्या त्या राज्य व्यवस्थेमध्ये ती मिळवण्यासाठी चालू असलेला संघर्ष आणि त्यास मिळत असलेले यश ह्या अत्यंत लक्षणीय, वेधक आणि गौरवपूर्ण गोष्टी आहेत.
भारतात चार वर्षांपूर्वी तृतीयपंथीयांना सर्वोच्च न्यायालयाकडून जगण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.त्यामुळे अधिकाराच्या लढाईला ते भारतीय समाजव्यवस्थेत पात्र ठरले आहेत. याचा अत्यानंद या चळवळीतील लाखो तृतीयपंथीयांना आहे तसेच स्त्री मुक्ती चळवळीचा समभाव बाळगून वागणाऱ्या अनेक सामाजिक संघटनांना याबद्दलचा दया व सहानुभूती भाव ही आहे.
त्याच भावनेने मराठी रंगभूमीवर एक चाकोरीबाह्य कुरूप नावाचे काव्याचे नाटकात रूपांतर केलेले एक नवे नाटक धाडसाने नुकतीच पुढे येते आहे.त्याचा तिसरा प्रयोग एकोणीस मे दोन हजार बावीस रोजी साताऱ्यात झाला.त्या नाट्य अनुभवाविषयी–
नाट्य अनुभव हा रंगमंचीय अनुभव असतो.तो कथानक, अभिनय, प्रकाश,नेपथ्य यांचा एकूण परिणाम असतो. नाट्यानुभव ही स्वयम् जाणिवांची विकसनशील तात्कालिक अनुभूती असते.म्हणून कुरूप या नाटकाचे निवेदन ऐकताना समाज नावाच्या एका गतीचक्राच्या पायाला बसणाऱ्या जखमेचे कधीच बरे न करता येणारे तृतीयपंथी अस्तित्वाचे जे कुरूप झाले आहे,त्याबद्दलचे प्रथम निवेदन या ना त्या अनुभवाच्या आशया कडे सूचित करते.
मुळात या नाटकाच्या काव्य रूपांतराला नाट्याविष्काराचे रुपांतर देणे ही एक अवघड गोष्ट या चार कलावंतांनी केली आहे. जमीर कांबळे यांचे दिशाच्या कवितांचे नाट्यरूपांतर करण्याबद्दल खूप कौतुक!
शृंगार,पूजा, सण,बाजार, गिऱ्हाईक, रेल्वे स्टेशन,टाळी हे सामान्य तृतीयपंथीयांच्या वाट्याला येणारे निवडक सातत्यपूर्ण घटक आहेत.त्यातील संघर्ष,अपेक्षां आणि अवहेलना, अत्याचार,स्त्री सुलभ भावनेचे अस्वस्थपण आणि आंतरिक वेदनांचा करूण स्वर या उच्च भावनांच्या टोकाकडे स्वयम् निवेदन संवादातून जाणारे हे नाटक आहे.प्रेक्षकांच्या नैतिकतेच्या भाषेच्या अविष्काराच्या संस्कृतीच्या प्रचलित संकल्पनांना उध्वस्त करणारे हे नाटक आहे.
तृतीयपंथीयांचे शरीर आणि समाजाची नजर यावर हे नाटक भाष्य करते.शरीर आणि पुरुष कामना यातील पाशवीपणा यांचा हे नाटक शिसारी आणणारा अनुभव देते. पुढे नेत राहिले.गिऱ्हाईक आणि त्याची आई यांतला हळवा कोपरा आणि नकार हा नाट्य अनुभव चटका लावून जातो.
या चार कलाकारांच्या निवेदन शैलीतून हे नाटक आपल्यासमोर उभे राहते.संस्कृती, धर्म,मालकी, मातृत्व आणि खोटी स्वतः जपलेली सभ्यता या सर्व संकल्पनांचा चेंदामेंदा या निवेदनातून या चार कलावंतांनी सादर केला आहे.
आपल्या संवेदनशील मनावर आस्वादक भूमिकेतून जेव्हा धक्का पोहोचतो, तेव्हा आंतरिक व्यवस्थेचे सगळे संकेत उद्ध्वस्त होतात आणि माणूस हा छोटा -खोटा- थोटा कसा आहे हे त्यांच्या दाहक विधानांच्या आघातामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. नात्यांवर अवलंबून असणाऱ्या घेणाऱ्या प्रेक्षकांच्या हळव्या मानसिकतेला घरघर लावणारे हे नाटक आहे. नाट्याविष्कार सादर करणाऱ्या कलावंतांच्या देहबोली,संवादफेक यातील भावना आवेग जरी अंतरिक नैसर्गिक वेदनांचा भाग असला, तरी साध्य झालेला परिणाम हा अंतर्मुख करणारा ठरतो.
वर्तमानातील तृतीयपंथीयांच्या जीवनाच्या अवहेलनेचा जिवंत अनुभव हे नाटक देऊन जाते.हे नाटक पुरुष सत्तेच्या सर्व प्रकारच्या अत्याचाराचा पाढा वाचते. त्यामुळे हे नाटक तृतीयपंथी चळवळीचे प्रबोधन नाटक ठरते. अभिजनांच्या स्त्री मुक्ती चळवळ बरोबर फारकत घेऊन पुढे निघाले आहे हे नाटक.
धर्मातील तृतीयपंथीयांचे जगणे,धर्मातील तृतीयपंथीयांच्या बाबतच्या श्रद्धा यांना हे नाटक स्पर्श करत नाही हे या नाटकाचे सगळ्यात मोठे रचनेतील, निवेदनातील,आशयातील वेगळेपणाने श्रेष्ठत्व आहे.शाप,बरकत, समृद्धी आणि आशीर्वाद या वर्तमानकाळातील आपल्या मनातील कल्पनांना हे नाटक सहज पार करून पुढे जाते. त्यामुळे धर्माच्या गुंत्यात तृतीयपंथीय किन्नर यांच्या जगण्याचे कारण,शोध,निर्माण आणि व्यवस्था या प्रश्नांची उत्तरे न देता हे नाटक स्त्री-मुक्ती चळवळीच्या आगामी शतकातील येऊ घातलेल्या वेगळ्या, एका पुरोगामी, मानवतावादी वर्ण,पंथाच्या निर्मितीची चाहूल हे नाटक व्यक्त करते.ही मनाच्या जाणिवा नष्ट होणारी गोष्ट नाही.तर संवेदनेच्या दया व सहानुभूतीच्या जाणिवा विकसित होणारा समाज हा शरीरभावाच्या पलीकडे जाऊन समभावाने जगणारा एक नवा वर्ग जगभर निर्माण होतो आहे. तो मालकी हक्क स्वतःहून नाकारत एकमेकात विलीन होतो आहे, असे जग असणार आहे हे सूचित करणारे हे नाटक आहे.धर्ममार्तंडांना, राज्यव्यवस्थेला प्रश्न न विचारता, अर्ध्या विश्वातील स्त्रियांच्या दृष्टिकोनाला प्रश्नांकित न करता हे नाटक कवितेच्या आशयापुरते सीमित राहून पुढे जात असलेले नाटक आहे असे नोंदवावे लागते.
या नाटकातील संवाद व मुद्राभिनय व विधानांमधील भेदकपणा हे काळीज कापत जातात.
समाज म्हणजे तरी काय?जाणिवा असतात. जाणिवांचा विकास हा समाजाच्या सभ्यतेचा विकास असतो.हा विकास करण्यासाठी तृतीयपंथीय कुरूप या व्यवस्थेच्या शतकांच्या गती पायाला निसर्गाने निर्माण केलेल्या जखमेला कापून टाकणारे हे नाटक आहे.भळभळत्या वेदनेच्या रक्तप्रवाहाची जाणीव करून देणारे हे नाटक आहे.नाटक आपले काळीज मागते आहे.दया आणि सहानुभूतीची अपेक्षा कामना करते आहे.समभावाच्या जगण्याचा अधिकार मागते आहे. हे नाटक संस्कृतीच्या पुरुषसत्ताक वासनेच्या सगळ्या नैतिक कल्पनांना उध्वस्त करणारे हे नाटक चाकोरीबाहेरचे नाटक म्हणून कायम लक्षात राहील.हे समाजाच्या एकूण जनमनासमोर सर्वत्र येण्याची नितांत गरज आहे. बदलते दृष्टीकोन, जाणिवा या दुःख आणि वेदना निरसनासाठी उपयोगी पडू शकतात. म्हणून हे नाटक वेदनांचे निरसन नाटक आहे.समभावाचा आक्रोश आहे.
कवयित्री -दिशा पिंकी शेख नाट्यरूपांतर -जमीर कांबळे
कलाकार -सागर लोधी, कुणाल पुणेकर, सतीश सांडभोर.
अपारंपरिक विषय आणि प्रभावी सादरीकरण केल्याबद्दल संपूर्ण टीमचे कौतुक!
काल सातार्यातील तुषार भद्रे,विजय कदम,किशोर बेडकिहाळ,बाळासाहेब कचरे यांच्या हस्ते या चारही कलावंतांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ह्या नाट्यप्रयोगाला प्रथम संधी दिल्याबद्दल परेश ज. मा. यांचाही सत्कार सीमंतिनी नुलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
नाट्यप्रयोगानंतर निवडक रसिक प्रेक्षकांनी दिलेली दाद ही मन हेलावून जाणारी ठरली.
हा प्रयोग साताऱ्यात संयोजित करण्यासाठी सागर गायकवाड,डॉ. अदिती काळमेख या दोघाजणांचे कुटुंबीय यांनी पुढाकार घेतला आणि नंतर गुलमोहर टीममधील कबीर, सारंग, डी. एस., डॉ. राजश्री, हर्षल राजेशिर्के यांचे सहकार्य मिळाले.नाट्यप्रयोग उत्तम सादर होण्यासाठी श्रम घेणाऱ्या सर्वांचे कष्ट हे सलाम करण्यासारखेच आहेत. त्यांना अनेक धन्यवाद दिल्याशिवाय नाट्य आस्वाद पूर्ण होऊ शकत नाही.पण डॉ. अदिती यांच्या आवाहनाला उस्फुर्त आणि संवेदनशील प्रतिसाद देऊन साताऱ्यातील सुजाण नागरिकांनी पैसे दिले आणि अशा या लोकसहभागातून हा प्रयोग उभा राहिला. हीही एक वैशिष्टपूर्ण घटना आहे.
या नाट्य प्रयोगानंतर झालेली प्रश्न -उत्तरे- अभिप्राय- प्रतिक्रिया या जरी विस्कळीत असल्या,तरी त्या कुरूप या नाटकाच्या मांडणी आणि आशयाला उपयुक्त होत्या.
एकूणच किन्नर आणि वर्तमान समाज यांच्या व्यथावेदनांचे नवे अविष्कृत काव्य नाटक रूपांतर पहावयास मिळाले..हा उत्तम रंगमंचीय अविष्कार अनुभवता आला याचा अत्यानंद खूप मोठा आहे.या सर्व वेदना आणि विचारांचा प्रगल्भ अविष्कार आणि अभिनयसमृद्ध कलावंतांना अनेक अभिनंदन करूनच मनापासून धन्यवाद देणे महत्त्वाचे ठरते.
टीप -जनमनाच्या भिन्न मतांचा आदर करून हे नाट्य समीक्षण आस्वादक अंगाने स्वीकारावे.
शिवाजी राऊत -ज्येष्ठ पत्रकार
सातारा.