जवाहर कारखान्याच्या नामविस्तारासशासनाची मान्यता
हुपरी- जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २७ सप्टेंबर २०२१ रोजीच्या ३२ व्या वार्षिक साधारण सभेमध्ये सभासदांनी कारखान्याचा नामविस्तार “कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हपुरी यळगूड” असे करण्यास सर्वानुमते मंजूरी दिली होती. त्यास अनुसरुन भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे मा. केंद्रीय निबंधक, नवी दिल्ली यांनी कारखान्याच्या पोटनियम दुरुस्तीस नुकतीच मान्यता दिलेली आहे. त्यानुसार कारखान्याचा नामविस्तार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी यळगूड ४१६ २०३, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (महाराष्ट्र) याप्रमाणे झालेला आहे. कारखान्याच्या वाटचालीतील हा अत्यंत आनंदाचा क्षण असून कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक सभासद, ऊस पुरवठा करणारे बिगर सभासद शेतकरी व अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यानिमित्त झालेल्या कारखान्याच्या संचालक मंडळ सभेमध्ये याची नोंद घेण्यात आली. यावेळी संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांचा संचालक मंडळाच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.आवाडेदादांच्या नेतृत्वाखालील कारखान्याच्या पारदर्शि कामकाजामुळे मागिल २९ वर्षात शेतकरी, कामगार, शासन, बँका अथवा अन्य कोणत्याही घटकाची देय बाकी कारखान्याने ठेवलेली नाही. ही अत्यंत महत्वाची आणि जमेची बाजू आहे. तसेच सभासद शेतकन्यांचा व्यवस्थापनावरील विश्वास दृढ झाल्याने संचालक मंडळाच्या आतापर्यंतच्या सर्व निवडणूका बिनविरोध पार पडल्या आहेत. उत्तम आर्थिक व्यवस्थापन, उच्च तांत्रिक कार्यक्षमता, ऊस विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी, देशातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये उच्चांकी ऊस गाळप या बाबींची कटाक्षाने आणि जाणिवपूर्वक अंमलबजावणी केल्यामुळे देश आणि राज्य पातळीवरील विविध नामांकित संस्थांकडून कारखान्यास अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. सुरुवातीस दैनंदिन २५०० टन ऊस गाळप करणारा जुना कारखाना ते आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज असा आज १६००० टन ऊस गाळप आणि २७ मेगावॅट वीज निर्मिती करीत आहे. कारखान्याच्या या नेत्रदिपक प्रगतीमागे आवाडेदादांनी दिलेला बहुमुल्य वेळ, योगदान, श्रम, दादांचे प्रगल्भ विचार, विशाल दूरदृष्टी आणि कृतीशील कार्य या बाबी विशेष उल्लेखनिय आहेत..
आवाडेदादांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत केवळ शेतकन्यांचे हित जोपसण्यासाठी १९९० साली लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. कारखाना उभारणीसाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे या नामविस्तारामुळे सार्थक झाले आहे. तसेच लवकरच देशातील मान्यवर नेत्याच्या प्रमुख उपस्थितीत हा नामविस्तार सोहळा भव्य आणि दिव्य स्वरुपात संपन्न होणार आहे. त्यासाठी त्यांना निमंत्रणही देण्यात आले असून त्यांनी ते स्विकारलेले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांच्यामध्ये या कार्यक्रमाची एक वेगळीच उत्सुकता लागून राहिलेली आहे. अशी भावना कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
याप्रसंगी आवाडेदादांनी सर्व सभासद, शेतकरी, आजी माजी संचालक तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, सर्व अधिकारी कर्मचारी, हितचिंतक यांचे पाठबळ व सहकार्य यामुळे कारखान्याने अल्पावधित उत्तुंग भरारी घेऊन देशपातळीवर नावलौकीक प्राप्त केला. त्यामुळे कारखान्याच्या या वाटचालीचे हे श्रेय माझे एकट्याचे नसून सर्वांचे आहे. यापुढेही कारखान्याच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवून नावलौकिकास साजेसे असे कामकाज सर्वांनी मिळून करावे अशी भावना त्यांनी व्यक्तकेली व सर्वांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.