स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताची जी बलस्थाने दिसत आहेत त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील द्रष्ट्या नेतृत्वाचा मोठा वाटा – प्रा. डॉ.जे.एफ. पाटील

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताची जी बलस्थाने दिसत आहेत त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील द्रष्ट्या नेतृत्वाचा मोठा वाटा –  प्रा. डॉ.जे.एफ. पाटील

इचलकरंजी ता. २५, ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध भारतीय जनतेने नव्वद वर्षे असीम त्याग करत व धैर्य दाखवत जो संघर्ष केला त्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. स्वातंत्र्याच्या ज्या प्रेरणा होता त्या प्रेरणा घेऊन नवभारताची उभारणी करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली केला गेला. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताची जी बलस्थाने दिसत आहेत त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील द्रष्ट्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे असे मत जेष्ठ अर्थतज्ञ व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ.जे.एफ. पाटील यांनी व्यक्त केले ते समाजवादी प्रबोधिनीच्या विविध शाखांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने अभ्यासवर्गात ” स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ” या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर होते. स्वागत व प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

डॉ.जे.एफ.पाटील म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेची निर्मिती, संस्थानांचे विलिनीकरण, भारतीय रिझर्व बँकेची स्थापना, योजना आयोगाची निर्मिती, भारतीय स्टेट बँकेची स्थापना, एलआयसीची स्थापना, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे ,जमीनदारीचे उच्चाटन, औद्योगिकीकरणाला चालना ,इस्त्रोपासून आयआयटी सारख्या अनेक संस्थांची उभारणी, हरितक्रांती आदी असंख्य बाबी भारताच्या सर्वांगीण विकासात अतिशय मोलाच्या ठरल्या आहेत.१९७० पूर्वी नागपूर योजना व हैद्राबाद योजना या नावाने रस्तेविकासाचे एक प्रारूप तयार केले गेले.आजचा रस्तेविकास त्याच मार्गावरून होतो आहे.१९४७ नंतरच्या सर्वच सत्तानी देशाच्या विकासात मोलाची भर घातली आहे.

प्रा. डॉ.जे.एफ. पाटील पुढे म्हणाले ,पहिल्या साठ – पासष्ट वर्षात काहीच झाले नाही अशी एक अत्यंत चुकीची व विकृत मांडणी गेल्या काही वर्षात केली जात आहे. उलट त्या काळात केलेल्या उभारणीमुळे आज ही देश टिकून आहे.मात्र अलीकडच्या काळातील चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक बाबतीत घसरणीला लागतो आहे. महागाई पासून बेरोजगारी पर्यंतचे प्रश्न तीव्र होत आहेत. त्याबाबत चर्चाही संसदेत केली जात नाही.संवैधानिक मूल्यांची प्रतारणा केली जात आहे.याचा विचार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये भारतातील सर्वसामान्य जनतेने केला पाहिजे. संवैधानिक मूल्य व्यवस्थेवर उभा राहिलेला भारत तयार करत शतक महोत्सवाकडे वाटचाल केली पाहिजे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना दशरथ पारेकर म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने तयार झालेले भारतीय संविधान बहुमताने नव्हे तर एकमताने मंजूर होण्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचे योगदान फार महत्त्वाचे आहे. आणीबाणीचा अपवाद सोडला तर इंदिरा गांधींचेही योगदान नवभारताचे उभारणीत मोठे राहिले आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करत असताना, संविधानाच्या आहे त्याच ढाच्यामध्ये हुकूमशाहीची प्रस्थापना करण्याचा घातक प्रयत्न होतो आहे. स्वायत्त संस्थांचा अत्यंत विकृत पद्धतीने वापर केला जात आहे. नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच होणे, मूलभूत हक्कांपासून ते दुरावणे, इतिहासाची मोडतोड करणे यातून भारत खिळखिळा होऊ शकतो.म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रबोधनाची चळवळ अधिक गतिशील करणे ही आजची खरी गरज आहे. यावेळी जयकुमार कोले,शशांक बावचकर, प्रा.शिवाजी होडगे,बी.एस.खामकर,के.एस.दानवाडे, प्रा.रमेश लवटे आदींनी मनोगते व्यक्त केली.अन्वर पटेल,साताप्पा कांबळे,सौदामिनी कुलकर्णी,मनोहर जोशी,महालिंग कोळेकर,आनंदा हावळ आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *