मुलाने लावले आई वडीलांचे लग्न
विजय व भारती यांचा अठ्ठावीस वर्षा पुर्वी प्रेम विवाह झाला होता. विजय व्यवसायाने वकील तर भारती मुंबईतील केईएम रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. प्रेमाच्या तारा जुळल्या गेल्या. लग्नाच्या आणाभाका घेतल्या गेल्या. आयुष्यभर एक साथ राहण्याची स्वप्ने रंगवू लागली. पण प्रेम विवाह! सर्व काही आलबेल असताना घरातून प्रखर विरोध सुरू झाला. एकत्र मिळण्यास विरोध होऊ लागला. दोन कुटुंब एकत्र येण्याऐवजी दोन कुटुंबात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली.
15 आँगस्ट1994 . त्यादिवशी मुसळधार पाऊस. विजय व भारती यांनी घरातून फिल्मी स्टाईलने जाऊनने लग्न केले. लग्न समारंभ कसला दोन चार मित्रांच्या साहाय्याने रेशमी गाठी बांधल्या गेल्या. दांपत्याच्या मनात एक खंत. आपल्या लग्नात कोणाला बोलावता आले नाही. भारती आपल्या मुलाला मकरंदला सांगत होती, “मी तुझे लग्न चांगल्या प्रकारे करणार” आपले सर्व नातेवाईक असणार!
मकरंदला आपल्या आई वडिलांची खंत कळली. आई बाबांच्या लग्नात आजी आजोबा, नातेवाईक, मित्रमंडळी नव्हती. तत्कालीन परिस्थितीमुळे पळून जाऊन लग्न केले. त्यांची ही खंत दूर करण्यासाठी मुलगा मकरंद यांनी अत्यंत नियोजन पुर्ण योजना आखली व 15 आँगस्ट 2022 रोजी म्हणजे आई वडिलांच्या लग्नानंतर अठ्ठावीस वर्षाने आई वडिलांचे लग्न आयोजित केले. सभामंडप, लग्न विधी, ब्राह्मण, लग्न विधी या सर्वांची तयारी केली. सर्व नातेवाईक व मित्र मंडळींना निमंत्रण दिले व त्याची माहिती आई वडिलांना न देता सिध्दिविनायक मंदिरात दर्शनासाठी जायचे आहे असे सांगून थेट लग्न मंडपात आणले व आईवडिलांचा विवाह पार पाडला. विजय गोपाळ पुजारी व भारती लक्ष्मण नारकर पुन्हा विवाह बंधनात अडकले. 15 आँगस्ट रोजी पार पडलेल्या या विवाहाची चर्चा मात्र चालू आहे. मकरंद पुजारी या पुत्राने आपल्या आईवडिलांच्या केलेल्या या लग्नाची चर्चा सुरू आहे. अशा आगळ्यावेगळ्या लग्नाला शुभेच्छा.!