तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ; युवकांमधील कौशल्य विकासाद्वारे रोजगार वाढीस प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ; युवकांमधील कौशल्य विकासाद्वारे रोजगार वाढीस प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि

नाविन्यता यात्रेचा शुभारंभ

युवकांमधील कौशल्य विकासाद्वारे रोजगार वाढीस प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. राज्यात उद्योग- रोजगार वाढविण्यासाठी राज्यशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. युवकांमधील कौशल्य विकासास शासन प्राधान्य देणार असून त्याद्वारेही रोजगार कसा वाढेल हे आम्ही पाहणार आहोत. आज सुरू होत असलेली स्टार्टअप व नाविन्यता यात्रा राज्यातील कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला व्यापक गती देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

        वर्षा निवासस्थानी मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यात्रेचा शुभारंभ केला. याप्रसंगी राज्याचे कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कौशल्य विभागाचे सहसचिव तथा महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, कौशल्य विकास उपायुक्त डी. डी. पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

        स्टार्टअप यात्रेद्वारे राज्यातील ६ विभागांमध्ये स्टार्टअप, उद्योजकता, नाविन्यता, युनिकॉर्न याविषयक मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार असून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतीना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत. यात्रेतील मोबाईल व्हॅन ही राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय, लोकसमुह, एकत्रित होणाऱ्या जागा या ठिकाणी जाऊन उद्योजकता आणि स्टार्टअपविषयी जनजागृती करेल. नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन त्यांना माहिती देण्यात येईल. यात्रेमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्रांचेही (Bootcamp) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक उद्योजकांची व्याख्याने होतील. त्याचबरोबर नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या नागरीकांना त्यांच्या संकल्पनांचे शासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

१० हजारापासून १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके

        कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीसमोर अंतिम सादरीकरण होईल. राज्यस्तरावर एकूण २६ विजेत्यांची निवड केली जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यांमध्ये उत्तम ३ विजेत्यांची निवड केली जाईल. २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी पारितोषिके देण्यात येतील. विभागस्तरावर ६ सर्वोत्कृष्ट नवउद्योजक व ६ सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. राज्यस्तरावर १४ विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. यामध्ये प्रथम पारितोषिक १ लाख रुपये तर व्दीतीय पारितोषिक ७५ हजार रुपये आहे. याशिवाय विजेत्या संकल्पनांना प्री-इन्क्युबेशन तसेच इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल, निधी सहाय्य, स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ज्ञ व संस्थांद्वारे मार्गदर्शन, सॉफ्टवेअर, क्लाऊड क्रेडीट्स यांसह इतर आवश्यक पाठबळ देण्यात येणार आहे.

        राज्यभरात होणाऱ्या या स्टार्टअप यात्रेचे नियोजन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की, एकाच वेळी राज्यातील सहा विभागातून स्टार्टअप यात्रेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होत असल्याने आनंद होत आहे. हा उपक्रम महिनाभर चालणार असून यातून नवोद्योजकता आणि कौशल्य विकासाला  चालना मिळेल. राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पक युवावर्ग आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ते नवनवीन संकल्पना विकसीत करीत आहेत. राज्याच्या तळागाळातून अशा नावीन्यपूर्ण संकल्पनांचा व नवउद्योजकांचा शोध घेऊन त्यांच्या संकल्पनांना बळ देण्यासाठी स्टार्टअप यात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पनांचा राज्याच्या विकास प्रक्रियेत लाभ घेता येणार आहे. राज्याच्या स्टार्टअप परिसंस्थेला अधिक चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *